शासनाच्या खारपट्टी विभागाचे दुर्लक्ष, शेतीला नापिकीचा धोका
भिवंडी: तालुक्यातील जुनांदुर्खी गावालगत खाडीपात्राचे बांध फुटल्याने भरतीच्या वेळी खाडी पात्रातील पाणी थेट शेतकऱ्यांच्या जमिनीत शिरले आहे. मागील वर्षभरापासून गावातील शेती पाण्याखाली जात असल्याने शेतीला नापिकाचा धोका झाला असून त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
भिवंडीच्या पश्चिमेकडून वाहणारी वसई खाडी असून समुद्राचे खारे पाणी या खाडीच्या प्रवाहाने भिवंडीच्या दिशेने शेलारपर्यंत येते. पावसाळ्यात भिवंडीतील ग्रामीण भागातून वाहणारी कामवारी नदी शेलारपर्यंत येऊन त्या नदीचे पाणी वाहत या खाडीच्या पात्रात जाते. सध्या या खाडीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात केमिकलचे दूषित पाणी जात असल्याने हे पात्र प्रदूषित झाले आहे. या प्रदूषित पाण्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यासाठी केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका झाल्या, मात्र कारवाई झाली नाही.
रविवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. तत्पूर्वी गेल्या वर्षभरापासून जुनांदुर्खी गावाला लागून असलेला खाडीचा बांध फुटून या किनारी असलेल्या जवळपास २५ ते ३० एकर जमिनीत हे खाडीचे पाणी शिरले आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यास या परिसराला पाण्याच्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच केमिकलयुक्त पाणी शेतात शिरून शेती नापीक होण्याचा धोका वाढल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गावात भरतीच्या पाण्याने पावसाआधीच जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित राहावे लागणार असून अनेकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीसह जिल्हापरिषदेचे पाटबंधारे विभाग आणि शासनाच्या खरपट्टी विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करीत आहे.
शासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि येथील शेतकऱ्यांची मदत करावी अन्यथा शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, अशी विनंती जुनांदुरखी गावचे समाजसेवक नितेश पाटील यांनी केली आहे.