थर्टी फर्स्टनिमित्त निसर्गरम्य स्पॉट, ढाबे, फार्महाऊस पोलिसांच्या रडारवर
ठाणे: मागीलवर्षी कासारवडवली खाडीलगत आयोजित केलेल्या भव्य रेव्ह पार्टीत लाखोंचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते तर ९०हून जास्त तरुण तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे यंदा नववर्ष स्वागताच्या निमित्ताने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून खाडी आणि जंगल परिसरावर तसेच समाज माध्यमांवरील रेव्ह पार्टीच्या जाहिरातींवर देखील लक्ष ठेवण्यात येणार असून पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या खाडीलगत तसेच निर्जनस्थळी होणाऱ्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा यंदा ड्रोन वॉच असणार आहे. तसेच एखाद्या हॉटेल किंवा उच्चभ्रू वस्तीतील होणाऱ्या अमली पदार्थांच्या पार्टीवर पोलीस बारीक लक्ष ठेवणार आहेत. यासाठी ठाणे गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली असून पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रसंगी येऊर, उपवन, घोडबंदर तसेच ग्रामीण भागातील निसर्गरम्य ठिकाणे, ढाबे, फार्महाऊसवर धाड टाकली जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणतीही हुल्लडबाजी सहन केली जाणार नसल्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.
नववर्षाच्या स्वागताच्या आनंदात विरजण पडू नये किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहर आणि ग्रामीण मिळून ७५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून ५०० हून अधिक वाहतूक पोलीस ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी ३१ डिसेम्बरच्या रात्री सज्ज असणार आहेत.
वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार कारवाई मोहीम हाती घेतली असून थर्टीफस्टच्या रात्री होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला गेला आहे.
मागील नववर्षाच्या एक दिवस आधीच ठाण्याच्या कासारवडवली खाडीलगत निर्जनस्थळी आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली होती. गुन्हे शाखा युनिट -५ च्या पथकाने मध्यरात्रीनंतर छापेमारी करीत आठ लाख तीन हजारांचे अंमली पदार्थ जप्त करीत ड्रग घेऊन धुंद झालेल्या ९० पुरूष आणि ५ महिला तसेच रेव्ह पार्टी आयोजन करणाऱ्यासह ९७ जणांना अटक केली होती. दरम्यान, या पार्टीची राज्यभर जोरदार चर्चा झाली असताना यंदा ठाणे पोलिसांनी खडा पहारा ठेवला आहे. तसेच कोणतेही अंमलीपदार्थ विक्री, सेवन अथवा रेव्ह पार्टी करीत असल्याबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातूनरेव्ह पार्टीच्या प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवले आहे. नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करावे, मद्यप्राशन करून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका पोहोचवु नये, असे आवाहन पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले आहे.