“ स्वप्न मनाचा खेळ की .”…

माणसाने स्वप्नाळू असणे अजिबात वावगे नाही. स्वप्ने ही पहायला हवीतच. तरच तो त्यादृष्टीने प्रगतीपथावर जाऊ शकतो व त्यादृष्टीने यथायोग्य पाऊले टाकीत जातो. स्वप्न पाहणे एक जिवंतपणाचे लक्षण मानले तर अजिबात चुकीचे ठरू नये. जागृतावस्थेत भविष्याची स्वप्ने रंगवणे व ते पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे ही तर माणसाच्या जगण्याची व जगविण्याची गुरुकिल्ली आहे. प्रयोगशाळेत एखादा प्रयोग करताना हेतू / संकल्पना, साधने, प्रक्रिया व परिणाम हे महत्वाचे घटक समजले जातात. त्यामुळे एखाद्या कामाची संकल्पना जितकी उच्च, त्यानुसार पुढील घटक कार्यरत तितक्याच उच्च प्रकारचे परिणाम दिसून येतात. साहजिकच त्याचा परिणाम वापर तितकेच मोठे असते. शिक्षण वास्तू संसार, संतती, वैभव, संपन्नता आदीसाठी माणसाने स्वप्नाळू असले तर अजिबात वावगे नाही. योग्य प्रयत्नांती ती स्वप्ने फलद्रूप होऊ शकतात. 

जागृत अवस्थेप्रमाणे निद्रावस्थेत देखील आपणास बऱ्याचदा स्वप्ने पडतात. कधीकधी ही भविष्यातील संकेत सुचवून जातात. कित्येकदा आपण त्याकडे तितक्या गांभीर्याने पाहतही नाही. बरीच सूचक स्वप्ने कित्येकदा आपल्याला सतत जागृत करीत असतात किंवा धोक्याचे इशारे देत असतात. कोणत्या न कोणत्या स्वरूपात सुख / दु;खद घटनांचा तपशील देखील मिळतो. पण त्याचे महत्व बऱ्याचदा आपणास नंतर समजते इतकेच. जागृतावस्थेत माणूस स्वप्ने पाहतो तर निद्रितावस्थेत माणसाला स्वप्ने पडतात. आपण जागृतावस्थेतील स्वप्ने पूर्ण विचारांती, सहेतुक विवेक जागृत ठेवून पाहत असतो तर निद्रितावस्थेतील स्वप्ने पडण्यासाठी अनेक कारणे त्यामागे असू शकतात. वास्तवाशी त्याचा मेळ बसेलच असे सांगता येत नाही आणि आपल्याकडून त्याकडे पाहिजे तितके सूचकतेने पाहिले जात नाही, कारण ते स्वप्न असते व निद्रावस्थेपुरतेच शाबूत असते पण जागृतावस्था सुरू झाल्यावर झोपेतील स्वप्ने अदृश्य होतात, कित्येकदा पुढे स्मरणात देखील राहत नाहीत हे विशेष आहे. कित्येकदा स्वप्नावस्थेत आपण रमत असतो, हे म्हणतात ते अजिबात चुकीचे नाही.

कोणतेही स्वप्न रात्रीच्या पहिल्या प्रहरात पडले असता त्याचे फळ एका वर्षाने मिळते. दुसऱ्या प्रहरातील स्वप्नांची फलप्राप्ती सहा महिन्यांनी होते, तिसऱ्या प्रहरातील फलप्राप्ती तीन महिन्यांनी होते. सूर्योदयी पडलेल्या स्वप्नाचे फळ तत्काळ मिळते असे म्हणतात. कित्येकांना आलेल्या अनेक अनुभवातून काही आडाखे बांधले जातात. अर्थात त्यात लवचिकता देखील खुप असते. शुभ स्वप्ने पुढील असू शकतात. उदा. नदी, समुद्र, तलाव दर्शन, पर्वतारोहण, रक्तदान, पांढरे वस्त्र, गंध, पुष्प, राने इत्यादी दर्शन, वृक्षारोपण, श्वेत सर्पाचा उजव्या पायाला झालेला दंश, विंचू दंश, नौका विहार, प्राण्यांचे दुग्धपान, पंच पक्वान्नाचे स्वतः ग्रहण न केलेले पाहणे, मेजवानी समारंभ. पशूंच्या कळपाचे दर्शन, धान्य व कपडा खरेदी, गाय, देव, ब्राह्मण, हत्तींचे दर्शन इ. गोष्टी. त्याचप्रमाणे अशुभ स्वप्नाची लक्षणे देखील आहेत. वारुळाचे कडुनिंबावर चढणे, तेल, लोखंड व कापसाचा लाभ, लग्न किंवा घड्याळ बंद पडणे, मृत्यु वार्ता, तार, केस, दात पडणे. प्रेताचे आलिंगन, नग्न पुरुषाचे दर्शन, कान, नाक तुटणे, श्राद्ध पिंडदान करणे, गुहा व अंधारातील प्रवेश. कर्ज देणे. इ. दर्शन.

शास्त्रकारांनी त्यावर उपाय देखील सांगितलेले आहेत. दुःखकारक स्वप्न पडले असताना घरातील देव्हाऱ्यातील देवांसमोर ते अशुभ स्वप्न कथन करावे वा तुळशीला कथन करावे त्याचप्रमाणे स्वप्न दोषपर्यंत श्री दुर्गा सप्तशती, विष्णुसहस्रनाम, महाभारतातील गजेंद्र मोक्ष आदीचा शक्यतेनुसार पाठ करावा वा दुसऱ्याकडून करून घ्यावा किंवा नुसता श्रवण करावा. निद्रे पूर्वी रात्री शक्यतो हलका आहार घ्यावा. जेवण व निद्रा यामध्ये निदान तीन तास तरी वेळ जाऊन द्यावे, त्यावेळी रामरक्षा, मारुती स्तोत्र, रुद्रसूक्त इत्यादींचे पठण करावे किंवा निदान रामनाम तरी घ्यावे. नजरेसमोर वातावरण पवित्र आनंदी व समाधानी उत्तम ठेवण्याचा प्रयत्न केल्यास झोप लागून मनाला देखील पूर्ण विश्रांती मिळते. स्वप्न हा एक मनाचा खेळ असला तरी त्याकडे सकारात्मकदृष्टीने पाहिले तर तोटा खचितच होणार आहे. अर्थात आपण ज्या चष्म्यातून पाहतो त्यावर सारे अवलंबून आहे.

रामकृष्ण विनायक अभ्यंकर, 

२/४६ भक्तियोग सोसा. परांजपे नगर 

वझिरा नाका बोरीवली प 

मुंबई ४०००९१, मोबा ९८१९८४४७१०