डॉ. मधुसूदन खांबेटे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

ठाणे : डॉ मधुसुदन तथा अप्पासाहेब खांबेटे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे टिसा हाऊस ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी उद्योजकांशी चर्चाही केली.

भारतीय लघुउद्योगाचे पितामह डॉ.मधुसुदन तथा अप्पासाहेब खांबेटे संस्थापक ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन व चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन (कोसिआ) यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टिसा हाऊस येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. यावेळी मंचावर मुख्यमंत्र्यांसमवेत सुजाता सोपारकर अध्यक्षा टिसा, संदीप पारीख अध्यक्ष कोसिआ, राम रेपाळे, एकनाथ भोईर, सुनील कुलकर्णी मानद महासचिव,टिसा व केशव कुलकर्णी सदस्य व आशिष सिरसाट उपाध्यक्ष, गोविंद सिंग उपाध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ सोनवणे कार्यकारी सचिव यांनी केले.

प्रारंभी परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांचे औक्षण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर ह्यांनी मुख्यमंत्र्यांचे व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी एमएसएमइचे व वागळे इस्टेटमधील भूखंड धारकांचे ज्वलंत प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर मांडले. मुख्यमंत्र्यांना उद्योगांच्या (एमएसएमई ) प्रश्नांबाबत विस्तृत निवेदन लेखी स्वरूपात दिले. मुख्यमंत्र्यांनी उपस्थित उद्योजकांना संबोधित करतांना आश्वासीत केले की आपले सरकार उद्योग व रोजगार वाढीसाठी काम करीत आहे. राज्य उद्योग वाढीत आघाडीवर आहे. सेमी कंडक्टर उद्योग देखील महाराष्ट्रात आला असून मोठी गुंतवणूक राज्याने खेचून आणली आहे, त्यामुळे येथील एकही उद्योग विस्थापित होणार नाही असे सांगितले. उद्योगांच्या अडचणीबाबत खासदार नरेश म्हस्के यांना देखील मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याच्या सूचना दिल्या .

अप्पा खांबेटेंची आठवण काढतांना ते म्हणाले की मी आमदार झाल्यानंतर राज्यशासनाशी संबंधित अडचणी अप्पा त्यांच्याकडे मांडायचे. डॉ.अप्पासाहेबांचे कार्य, योगदान फार मोठे आहे, ते सदैव लघुउद्योगांसाठी लढले त्यांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.