निरंजन डावखरे यांच्या विजय संकल्प मेळाव्यात सावधगिरीचा सल्ला
ठाणे: लोकसभा निवडणुकीत ४०० पारच्या घोषणेमुळे कार्यकर्ते निवांत राहिले, पण आता पदवीधरांच्या निवडणुकीत गाफील राहू नका, असा सावधगिरीचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले निरंजन डावखरे यांचा विजय संकल्प मेळावा ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे रविवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत चुकीचे नरेटिव्ह पसरवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. नरेटिव्ह पसरवण्यात काही एनजीओ देखील आघाडीवर होत्या. काही संस्था सरकारच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्या आहेत. एनजीओच्या रूपात हे अर्बन नक्षलवादी घुसले आहेत. मोदी हटाव हेच त्यांचे लक्ष होते, असा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
दुसरीकडे चारशे पारच्या आत्मविश्वासावर कार्यकर्तेही निवांत राहिले, मात्र या निवडणुकीत गाफील राहू नका असा कानमंत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
निवडणुकांना आम्ही धार्मिक वळण कधीच दिले नव्हते. मोदींनी १० वर्षात तर राज्यात आम्ही दोन वर्षात मोठा विकास केला आहे. मतांमध्ये आपण खूप कमी पॉईंटने मागे आहोत. चुकीच्या नरेटिव्हमुळे भामरे मालेगावात तर भिवंडीत कपिल पाटील यांना कमी मतदान झाले.
आता मोदीजी केंद्रात बसले आहेत, महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल , घरी बसणाऱ्यांना मतदार मतदान करणार नाहीत.असे एकनाथ शिंदे म्हणाले.
या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यकर्त्यांना गाफील न राहण्याचे आव्हान केले. लोकसभेत ठाणे आणि कोकणात महायुतीला यश आले, काही लोकांनी गर्जना केली आम्ही तडीपार करू, मात्र मतदारांनी त्यांनाच कोकणातून तडीपार केलं असा टोला फडणवीस यांनी लगावला. साडेसहा जागांपैकी साडेपाच जागा महायुतीच्या निवडून आल्या. चुकीच्या नॅरेटिव्हमुळे जे मुंब्र्यात घडले ते भिवंडीत घडलं, मात्र पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद महायुतीला मिळणार आहे. पानसे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्यामुळे फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे देखील यावेळी जाहीर आभार मानले. डावखरे तरुण उमेदवार आहेत. दोन टर्म त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. सर्वाना स्वभावाने जिंकणारा उमेदवार आहे. विधानपरिषदेत पदवीधर आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडले. सभागृहातील कामगिरी चांगली राहिली, जागरूक आमदार म्हणून पहिले जाते. डिजिटल शाळांचा उपक्रम पाच जिल्ह्यात राबवला. ही निवडणूक प्रचारापेक्षा नियोजनाची निवडणूक आहे. ठाणे जिल्ह्यावर सर्वात जास्त जबाबदारी आहे. रायगड जोडला तर दीड लाख मतदार होतात. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचीच सरशी होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
या मेळाव्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण, खा. नरेश म्हस्के, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, प्रमोद हिंदुराव, रमेश पाटील, रवींद्र फाटक, मंदा म्हात्रे, गीता जैन, उमा खापरे, जयप्रकाश ठाकूर, अविनाश जाधव, कुमार आयलानी, आनंद परांजपे, राजेंद्र गावित, संजय वाघुले, संदीप सागर नाईक, मीनाक्षी शिंदे, प्रताप सरनाईक आदी नेते उपस्थित होते.
आमचे बॉस फडणवीसच-गणेश नाईक
छोट्या चुका मोठ्या लोकांकडून होतात. त्यांना प्रेमाने सांगायची गरज आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असले असले तरी आमच्यासाठी पार्टीच्या अनुषंगाने आमचे बॉस प्रोटोकॉलप्रमाणे देवेंद्र फडणवीस आहेत, असा टोला यावेळी भाजपचे नेते गणेश नाईक यांनी यावेळी लगावला. यावेळी मतांचा उच्चांक करायचा आहे. नवी मुंबईत बैठक घेतली घेतली. जास्तीस्त जास्त मतदान होईल असा विश्वास गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत आपण खोट्या नरेटिव्हशी लढलो. त्यामुळे महाविकास आघाडीला ३१ तर आपल्याला १७ जागा मिळाल्या. खोटे नरेटिव्ह कसे दूर करता येतील, याची सुरुवात आपण केली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची भूमिका कोकण पदवीधर निवडणूक बजावणार असल्याचे राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.