बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लावा

संजय वाघुले यांची मागणी

ठाणे : गावदेवी येथील शेअर रिक्षा चालकांमुळे वाहतुक कोंडीत भर पडत असताना अमृता हॉटेलपासून विरुध्द दिशेने बेशिस्त रिक्षाचालक स्टेशनकडे जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यांच्यावर वाहतुक किंवा आरटीओकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी केला आहे.

रिक्षा चालकांच्या बेशिस्तीमुळे येथे अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे श्री. वाघुले यांनी सांगितले. यावर तत्काळ उपाय योजना करुन रिक्षा चालकांना शिस्त लावावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गावदेवी परिसरात सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास शेअर रिक्षा उभ्या असतात, त्यामुळे वाहतुक कोंडीत भर पडत असल्याचे चित्र दररोज दिसत आहे. गावदेवीला थांबा दिला असतांनाही येथे रस्त्याच्या मधोमध अस्ताव्यस्त रिक्षा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यात गावदेवीच्या अलिकडे असलेल्या अमृता हॉटेलपासून विरुध्द दिशेने रिक्षा चालक स्टेशनकडे जात असतात, परंतु त्याकडे देखील वाहतुक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाघुले यांनी केला आहे.

वाहतुक पोलीस देखील अनेक वेळा या ठिकाणी कर्तव्यावर नसतात आणि असले तरी देखील ते या रिक्षा चालकांवर कारवाई करीत नसल्याचा दावा वाघुले यांनी केला आहे.

दुसरीकडे येथून रिक्षा पकडणारे प्रवासी हे कल्याण-डोंबिवली येथून ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात कामासाठी आलेले असतात. त्यात महिलांची संख्या अधिक आहे. परंतु कामावर वेळेत जायचे असल्याने ते देखील जीवाची पर्वा न करता येथे रिक्षा पकडण्यासाठी तारेवरची कसरत करत असतात. त्यामुळे परिवहन व्यवस्थापक व ठाणे महापालिका प्रशासनाने गावदेवी येथे असलेल्या टीएमटीच्या थांब्यावर सकाळी ८ ते ११ आणि सांयकाळी ५ ते ६ या वेळेत वागळे इस्टेट येथे कामावर जाणाऱ्यांसाठी मिनी बसची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.