* उत्पन्नापेक्षा खर्च दुपटीहून जास्त
* अनुदान देता-देता प्रशासन थकले
ठाणे : टीएमटीचे महिन्याचे उत्पन्न सुमारे सात कोटी आहे, तर दुसऱ्या बाजूला वेतनासाठी १६ कोटी आणि इतर दोन कोटी असा १८ कोटी रुपयांचा खर्च दरमहा ठाणे पालिका प्रशासन अनुदानापोटी सहन करत आहे. परिणामी आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या पालिकेला टीएमटी कर्मचार्यांचा पगार काढताना नाकी नऊ आले असून वर्षाच्या पहिल्याच महिन्यात त्याचा फटका बसला आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी गत ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेची झाली आहे. ठाणेकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवणार्या या परिवहन सेवेचे आर्थिक चाक दिवसेंदिवस तोट्यात रुतत चालले असून आता ठाणे महापालिकेलाही हा पांढरा हत्ती पोसणे हाताबाहेर झाले असल्याचे उघडकीस आले आहे.
महिन्याची सहा तारीख उलटली तरी कर्मचार्यांच्या हाती वेतन पडलेले नसल्याने चिंता वाढली आहे.
ठाणेकरांना जलद आणि स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने ठाणे महापालिकेने परिवहन सेवा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत आजच्या घडीला शहरातच नव्हे तर शहरालगत ठाणे परिवहनच्या सुमारे ३५० बसमधून दोन ते अडीच लाख प्रवासी नियमित प्रवास करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय दबावामुळे परिवहनचे तिकीट भाडेवाढ रखडली आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलत देण्यात आली आहे. परिणामी दिवसाला केवळ सरासरी २० ते २५ लाखांपर्यंतचा गल्ला टीएमटीकडे जमा होत आहे. म्हणजे महिन्याला टीएमटीचे उत्पन्न सात कोटींच्या घरात पोहचते. एकूण बसेसचा विचार केला असता पालिकेच्या मालकीच्या केवळ ३५ बसेस आहेत. तर उर्वरित ३०० हून अधिक बसेस या ठेकापद्धतीवर आहेत. एकूण कर्मचारी दीड हजारांच्या घरात आहेत. त्यांच्या वेतनावर सुमारे १६ कोटी आणि इंधन, देखभालसाठी दोन कोटी असा सुमारे १८ कोटींचा खर्च दरमहा येत आहे. म्हणजे उत्पन्नाच्या दुप्पटीहून अधिक खर्च सोसावा लागत आहे.
डबघाईला आलेल्या ठाणे परिवहनला अनुदानरुपी मदतीचा हात महापालिकेकडून देण्यात येतो. पण कोरोनानंतर ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती डगमगली आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी सोडाच पण पूर्ण झालेल्या प्रकल्पांची बिलेही थकली आहेत. तर दुसरीकडे शासनाकडून येणार्या अनुदानावर ठाणे पालिका कर्मचार्यांचा पगार कसाबसा भागवताना वित्त विभागाला घाम फुटत आहे. त्यात परिवहन सेवेचा बोजा दर महिन्याला येत असल्यामुळे आर्थिक तरतूद करताना कसरत करावी लागत असल्याचे दिसते. याचा फटका वर्षाच्या पहिल्याच महिन्यात टीएमटीच्या कर्मचार्यांना बसलेला आहे. दर महिन्याला एक तारखेला खात्यात जमा होणारे वेतन आज सहा तारिख उलटली तरी टीएमटी कर्मचार्यांच्या हाती पडलेली नाही.
पालिकेने पैशांची तजबीज करून या महिन्याच्या पगाराचा निधी गोळा केला आहे. त्याच्या मान्यतेची फाईल आयुक्तांच्या टेबलवर ठेवण्यात आली आहे. त्यावर सही होताच टीएमटी कर्मचार्यांच्या खात्यात वेतन जमा होईल अशी अपेक्षा आहे. पण पुढच्या महिन्यात पुन्हा हीच कसरत करावी लागणार आहे.
परिवहन सेवेतून निवृत्त हेणार्या कर्मचार्यांची देणीही रखडली आहेत. त्यासाठी प्रत्येक बजेटमध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते. पण सध्या ही देणी देणेही पालिकेच्या अवाक्याबाहेर असल्याचे दिसून येत आहे. याबाबत टीएमटी कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि महापालिका आयुक्तांकडे वेतनाची फाईल आहे खा. नरेश म्हस्के आणि माजी नगरसेवक राम रेपाळे हे महिन्याला वेतन मिळवून देण्यात मदत करतात. आता देखिल त्यांनी महापालिका आयुक्तांना फोन केला असून आयुक्तांची मंजुरी झाल्यावर कामगारांनलचा पगार होईल, असा विश्वास व्यक्त केला.
तोट्यात रुतलेले चाक
महिना बसेस एकूण प्रवासी गल्ल्ला
फेब्रुवारी ३२७ १९३८७८ ८०२५७९५४
मार्च ३१९ १९१६७८ ७४५९५५९४
एप्रिल ३२६ २०७५४६ ६७४८८२६४
मे ३१४ १९४५८७ ६२७३३४६६
जून ३२९ २०४७६२ ६४६६८०९१
जुलै ३२१ २११६२६ ६८८२५७५७
ऑगस्ट ३२१ २१६१६२ ७३४९५४८७
सप्टेंबर ३३० १९९८८१ ६६७६७४७८
ऑक्टोबर ३६० २८०७५७ ७१८५३५७५
नोव्हेंबर ३५६ २६९३८८ ६५६१९३२१
डिसेंबर ३५४ २९१३२३ ७३३३८८२१