लहानग्या जलतरणपटुंची शहीद आणि स्व.आनंद दिघे यांना मानवंदना
ठाणे : साधारण ८ ते १७ वयोगटातील मुला-मुलींनी भल्या पहाटे ४ वाजता धरमतरच्या जेटीवरून स्वतःला पाण्यात झोकून दिलेणी तब्बल नऊ तासांनी गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांवर पाऊल ठेवले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कडाक्याच्या थंडीत शहिदांना आणि दिवंगत आनंद दिघे यांना आगळीवेगळी मानवंदना या लहानग्या जलतरणपटुंनी दिली.
ठाण्यातील मारोतराव शिंदे जलतरण तलावात अर्णव पाटील, अमीर साळसकर, जयराज नाखवा, वंशिका आयर, रोहन राणे, अथर्व पवार , सोहम देशपांडे, करण नाईक, मित गुप्ते, मनोमय लिंगायत, अमोल दिवाडकर, स्वरा हंजनकर, रुद्र शिलारी, अपूर्व पवार, गौरी नाखवा, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर, श्रीकर पेडणेकर आदी युवा होतकरु जलतरणपटू नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा कसून सराव करतात.
खडतर सरावामुळे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी ३३ किलोमीटरचे अंतर आपण रिले पद्धतीने पोहून पार करणार असा त्यांना पूर्ण विश्वास होता. ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकी नऊ जणांचे दोन गट तयार करण्यात आले. भल्या पहाटे चार वाजता त्यांनी स्वतःला पाण्यात झोकून दिल्यावर प्रत्येकी एक किलोमीटर अंतरांनंतर आपल्या पुढच्या सहकाऱ्याला टाळी देत दुपारी १ वाजता गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांना स्पर्श करत आपली मोहीम फत्ते केली.
या जलतरणपटुंचे प्रशिक्षक नरेंद्र पवार म्हणाले, खुल्या पाण्यातील विशेषतः सागरी जलतरणाच्या स्पर्धा वाढल्या आहेत. त्यामुळे सागरी जळतरणात ही मुलांना करियर घडवण्याची संधी मिळाली आहे. सागरी जलतरणात मानसिक आणि शारीरिक क्षमतेचीही कसोटी लागते. त्यातून आव्हानाला सामोरे जाण्याची सवय मुलांना व्हावी याकरता ही मोहीम आखण्यात आली होती. अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती आरती प्रधान यांनी या मोहिमेचे प्रोजेक्ट इंचार्ज म्हणून काम पाहिले.