ठाणे शहराच्या विकासासाठी विकासकांचेही योगदान आवश्यक

* केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे प्रतिपादन
* एमसीएचआयच्या गृह प्रदर्शनाचे उद्घाटन

ठाणे : ठाणे शहरातील बिल्डरांनी अद्ययावत ठाणे शहर घडविल्यास ‘ठाणे तिथे काय उणे’ अशी नवी म्हण स्थापित होईल. किंबहुना ठाणे शहराचा वेगाने विकास होत असताना, केंद्र व राज्य सरकारप्रमाणे बिल्डरांनीही योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी केले.

ठाणे शहरातील उत्तमोत्तम प्रकल्पातील नागरिकांच्या बजेटनुसार घरांचा समावेश असलेल्या ठाणे गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४ चे उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आ.प्रताप सरनाईक, एमसीएचआय, ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, अजय आशर, ठामपाचे अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी आदीसह अनेक विकासक उपस्थित होते.

ठाणे पश्चिम येथील रेमंड मैदानावर गृह उत्सव: प्रॉपर्टी २०२४ प्रदर्शनाला आजपासून सुरूवात झाली. येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ पासून रात्री ८ पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. उदघाटनानंतर ना. कपिल पाटील म्हणाले, ‘रिअल इस्टेट क्षेत्राबरोबरच नागरिकांच्या गरजेच्या दृष्टीकोनातून ठाणे शहर विकसित झाले आहे. ठाणे शहरातील नागरिकांना उत्तम राहणीमानाच्या दृष्टीने विविध सुविधा मिळत आहेत. यापुढील काळातही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प येत आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील नागरिकांना फायदा होईल, असे सांगितले.

गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कौतुक केले. या प्रदर्शनातून आतापर्यंत हजारो कुटुंबांना स्वप्नातील घर मिळविण्यास मदत झाली असल्याचे नमूद केले. दरम्यान, ठाणे शहर हे समृद्ध व सांस्कृतिक शहर असून, निसर्ग सौंदर्याबरोबरच सुरक्षित वातावरणामुळे या शहराची जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख होत आहे, याकडे एमसीएचआय, ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी लक्ष वेधले.

‘क्रेडाई एमसीएचआय’ने उपस्थित केलेल्या जीएसटी संदर्भातील विविध मागण्याबाबत राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामार्फत या प्रश्नावर आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले.