विकासकांना पुनर्प्रकिया केलेले पाणी वापरणे केले बंधनकारक

नवी मुंबई महापालिकेची सक्त भूमिका

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण सात मलप्रक्रिया केंद्रे अत्याधुनिक एस.बी.आर. तंत्रज्ञानावर सद्यस्थितीत कार्यान्वित आहेत. सर्व सांडपाण्यावर सातही मलप्रक्रिया केंद्रांमध्ये प्रक्रिया करण्यात येते. मलप्रक्रिया केंद्रांमधून बाहेर पडणा-या पाण्याचा अधिक प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने महापालिकेने विकासकांना बांधकामांसाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणे बंधनकारक केले आहे.

केंद्र शासनाच्या ‘अमृत मिशन’ अंतर्गत, नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कोपरखैरणे व ऐरोली येथे टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट उभारण्यात आले आहेत. सदर द्विस्तरीय प्रक्रियाकृत पाण्यावर त्रिस्तरीय प्रक्रिया करून, सदरचे पुनर्प्रक्रियायुक्त सांडपाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या टी.टी.सी. औद्योगिक क्षेत्रातील, औद्योगिक संस्थांना पिण्याशिवाय इतर वापरासाठी पुरविण्यात येते.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरु झालेली असून इतर खाजगी भूखंडावरील विकास कामेसुद्धा प्रगतीपथावर आहेत. सदर विकास कामांकरिता बहुतांशी पिण्यायोग्य पाण्याचा वापर होतो. सद्यस्थितीत पर्जन्यवृष्टीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले असून पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणात पुनर्प्रक्रियायुक्त पाणी उपलब्ध असल्याने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये नगररचना विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांच्या बांधकामासाठी यापुढे उपरोक्त त्रिस्तरीय पुनर्प्रकियाकृत पाण्याचा वापर करणे विकासकास बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.