उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मध्यरात्रीचे रक्तदान

ठाणे: स्व.आनंद दिघे यांनी २९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा आजही उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू ठेवली आहे. रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान केले.

रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र या संस्थेमार्फत यंदाही शिवसेनेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २५ पेक्षा जास्त वेळा रक्त देणाऱ्या रक्तदात्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तकर्ण पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच प्रत्येक रक्तदात्याला सन्माचिन्ह व प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले.

या शिबिरात खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी देखील रक्तदान केले. या शिबिरात एकूण ५१८ रक्त पिशव्या जमा झाल्या, अशी माहिती ठाणे शहर अध्यक्ष हेमंत पवार यांनी दिली.

या शिबिरास कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महिला ठाणे जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे, सचिव विलास जोशी, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आदी उपस्थित होते.