ठामपा आयुक्तांची ‘स्वच्छता’ मोहीम
ठाणे: शहरातील साफसफाईमध्ये होणारी दिरंगाई घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांना भोवली असून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी त्यांच्याकडे असलेला घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कार्यभार नव्याने बदली झालेले उपायुक्त तुषार पवार यांच्याकडे सोपवला आहे.
माजी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी उपायुक्त मनिष जोशी यांच्याकडे सहा महिन्यांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी दिली होती. घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कार्यभार ते प्रामाणिकपणे सांभाळत होते. त्यांच्याकडे सचिव, आरोग्य आणि जकात, एलबीटी हे देखील विभाग होते. मागील महिन्यात अभिजित बांगर यांची नवी मुंबई येथून ठाणे महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी शहरातील साफसफाईकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी साफसफाईच्या पाहणीच्या पहिल्याच दौऱ्यात पूर्व भागातील दोन सार्वजनिक स्वच्छता गृहाची साफसफाई करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली होती. रस्त्यावर कचरा दिसणार नाही याची काळजी घेण्याची आदेश अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले होते. रस्त्यावर कचरा दिसला तर तुम्हाला झोप कशी लागते, असे देखील अधिकाऱ्यांना सुनावले होते. महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी शहराच्या साफसफाईला प्राधान्य दिले होते.
आज मंत्रालयातून तुषार पवार यांची महापालिकेत बदली करण्यात आली होती. आयुक्तांनी उपायुक्त जोशी यांच्याकडे असलेले घनकचरा व्यवस्थापन आणि घनकचरा प्रकल्प या दोन्ही विभागाचा कार्यभार तुषार पवार यांच्याकडे सोपवला आहे.