ठाणे: भिवंडी लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर कपिल पाटील मुरबाड विधानसभा तर ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून माजी खासदार राजन विचारे त्यांचे नशीब आजमावणार असल्याची चर्चा ठाण्यात सुरु झाली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात मागील दहा वर्षे खासदार असलेले माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांचा राष्ट्रवादीचे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी पराभव केला होता. मुरबाड मतदार संघातील भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी या निवडणुकीत मदत केली नाही, असा समज करून श्री. पाटील यांनी मुरबाड विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा मनोदय मागील आठवड्यात जाहिर केला होता. त्याप्रमाणे त्यांनी मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. या मतदार संघात भाजपाचा आमदार असतानाही त्यांनी येथून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहिर केले आहे, त्यामुळे भाजपात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. याच मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे वामन म्हात्रे देखिल इच्छुक असल्याने महायुतीमध्ये या मतदारसंघात आत्तापासूनच संघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटप बोलणीमध्ये ही जागा कोणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे यांचा पराभव नरेश म्हस्के यांनी केला. या मतदार संघातून विधानसभा निवडणुकीत श्री. विचारे यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह ठाकरे गटातील शिवसेनेच्या शिवसैनिकांचा आहे. श्री. विचारे हे निष्ठावंत असून त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. ठाणे विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. या मतदार संघात त्यांच्याएवढा तुल्यबळ उमेदवार उबाठाकडे नाही. शिवसेनेचा या मतदारसंघात मोठा वर्ग आहे. श्री. विचारे यांना मानणारे अनेक जण असल्याने त्यांनी येथून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याने श्री. विचारे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा ठाण्यात सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ही जागा कोणत्या पक्षाकडे जाते त्यावर श्री. विचारे यांचा निर्णय अवलंबून आहे.