कल्याण : कल्याणजवळ असलेल्या उंबर्डे गावातील एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमात चिंतामण लोखंडे हे त्यांच्या हातातील रिव्हॉल्व्हर सुमीत भोईर यांना दाखवत असल्याचा व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. हळदी कार्यक्रमात लोडेड रिव्हॉल्व्हर दाखवत मोठ्या गर्दीत त्यांनी डान्स केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
उंबर्डे गावातील दत्त मंदिरासमोरच्या मैदानात दीप्ती लोखंडे यांच्या विवाहनिमित्त भव्य मंडप उभारण्यात आला होता. शुक्रवारी संध्याकाळी या मंडपात हळदी समारंभ होता. या कार्यक्रमात संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान स्टेजवर नाचत असताना चिंतामण लोखंडे यांनी कंबरेला लावलेले रिव्हॉल्व्हर बाहेर काढले. ते डाव्यात हातात घेत, हात उंचावून ‘मै हू डॉन’ या गाण्याच्या तालावर नाचू लागले. यावेळी चिंतामण लोखंडे यांच्या आजूबाजूला लहान बालके आणि महिलांसह वऱ्हाडी मंडळी नाचत होती. नजरचुकीने काही दुर्घटना याठिकाणी घडली असती तर त्याची जबाबदारी कुणाची होती, असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत होते.
सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसह सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य करून स्वसंरक्षणासाठीच्या परवानग्याचे जाहीर प्रदर्शन करून शस्त्र वापर परवान्याचा नियमभंग केला. त्यामुळे खडकपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार अविनाश पांडुरंग यांनी चिंतामण लोखंडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.