ठाण्यातील ११ विद्यार्थीनींकडून कर्तव्यपथावर नृत्य सादर

ठाणे : देशाच्या प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला. या मुलींवर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांनी ठाण्याचे नाव उंचावले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी सर्व राज्यांना आर. डी. परेड, वंदे भारत नृत्य उत्सव आणि चित्ररथाच्या सादरीकरणासाठी नवी दिल्लीत बोलाविले जाते. राज्यातील अव्वल कलाकारांना हा मान दिला जातो. यंदाच्या वर्षी `विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृ’ हा विषय सादरीकरणासाठी ठेवण्यात आला होता. त्यानुसार सांस्कृतिक संचालनालयामार्फत ५० कलाकारांसह कर्तव्यपथावर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीतील ११ विद्यार्थीनींची सादरीकरणासाठी निवड केली होती.

या विद्यार्थीनींना सांस्कृतिक विविधता आणि लष्करी पराक्रमाचे दर्शन घडविणारी शास्त्रीय नृत्य सादर करावयाची होती. त्यानुसार मुद्रा आर्ट अकादमीतील आकांक्षा मिराशी, अनुजा काळसेकर, धर्मी रमानी, मेहेक मालदे, प्रक्षिका घोडके, साक्षी वाडजे, भुमिका म्हसकर, साक्षी वेंगुर्लेकर, शर्वरी सावंत, मनिषा राय, निती परसिया आदी ११ जणींची निवड झाली. त्यांना मुद्रा आर्ट अकादमीच्या संचालिका तेजश्री सावंत, भवानी पर्फिर्मिंग आर्टचे अमय पाटील यांनी शास्त्रीय नृत्य, भरतनाट्यम आणि लोकनृत्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यानुसार त्यांनी कर्तव्य पथावर नृत्य सादर करून वाहवा मिळवली.