जप्त रकमेतील ८५ हजारांवर डल्ला; पाचजण निलंबित

ठाणे : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात तपासणी दरम्यान जप्त केलेल्या रकमेतून ८५ हजारावर डल्ला मारणाऱ्या भरारी पथक क्र.3 आणि ६ मधील उल्हासनगर महानगरपालिकेच्या तीन आणि पोलिस दलातील दोन अशा पाच जणांना मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी निलंबित केल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

संकेत चनपूर, संदीप शिरसवाल हे दोन लिपिक मुकादम, आण्णासाहेब बोरूडे तसेच या पथकातील पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार विश्वनाथ ठाकूर आणि पोलीस नाईक राजरत्न बुकटे असे निलंबित करण्यात आलेल्या उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यांच्यावर निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी ८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर तातडीने निलंबनाचीही कारवाई करण्यात आली आहे.

भांडुप येथें राहणारे बबन आमले, हे १८ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास म्हारळ नाका, उल्हासनगर नं.1 या ठिकाणाहून त्यांचे मित्र नितीन शिंदे यांच्यासह त्यांच्या इर्टिगा कारमधून अहमदनगर व पुणे जिल्हयातील फूल उत्पादक शेतकऱ्याकडील फूल मालाची विक्री करून त्या मालाचे पैसे त्यांना घरपोच देण्यासाठी रोख रक्कम ७ लाख ५० हजार घेऊन जात असताना भरारी पथकाचे प्रमुख संदीप शिरसवाल व संकेत चनपूर यांनी श्री.आमले यांच्याकडील पैशाबाबत “तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, पैसे जप्त करून ते परत मिळणार नाही” अशी भिती घालून या रक्कमेतुन ८५ हजार काढून घेतले.

ही घटना १८ ऑक्टोबर रोजी घडल्यानंतर श्री.आमले यांनी पोलीस उप-आयुक्त यांच्याकडे 19 ऑक्टोबर 2024 रोजी तक्रार दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य पाहता याबाबत पोलीस विभागाने अधिक तपास करून संपूर्ण घटनेचा अहवाल उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केला. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4 यांनी याबाबत तपास करून जाबजबाब नोंदवून घेवून २८ ऑक्टोबर रोजी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त व उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांना प्रथम अहवाल सादर केला होता. या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.शर्मा यांनी 31 ऑक्टोबर 2024 रोजी संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्यासाठी संबंधित विभागांना अहवाल पाठविला. भविष्यात पुन्हा असा प्रकार होवू नये, यासाठी प्रशासकीय कारवाईसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कठोर कारवाई निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली.

संबंधितांवर प्रशासकीय कारवाई सुरू असताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांना 8 नोव्हेंबर 2024 रोजी ही घटना समजल्यानंतर त्यांच्यामार्फत तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.शर्मा यांच्याकडून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर 8 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय शिस्तभंग विषयक कारवाई करणेबाबत पाठविलेल्या अहवालाच्या आधारे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त व पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4 यांनी संबंधित पाचही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.