सायक्लोफाईन ठरणार ठाण्यातील अशुद्ध हवेवर रामबाण उतारा

* आयआयटी मद्रासनिर्मित प्रकल्प
* ठाणे कॉलेज परिसरात हवा शुद्धीकरण यंत्राची उभारणी

ठाणे : मागील काही वर्षांत वाढते नागरीकरण, वाढती वाहने, बांधकामे, कचरा, वाहतूक कोंडी आणि उद्योगधंदे यामुळे ठाणेकरांना विषारी आणि अशुद्ध हवेशी संबंधित समस्यांशी तोंड द्यावे लागत आहे. या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे कॉलेज परिसरात आयआयटी मद्रासने तयार केलेल्या सायक्लोफाइन अर्थात हवा शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प ठाणे शहराच्या बिघडलेल्या हवेवर रामबाण उपाय ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तलावांचे शहर-ठाणे हे समृद्ध सांस्कृतिक वारसा, सुंदर तलाव आणि जलद शहरी विकासासाठी ओळखले जात असले तरी मुंबई महानगर प्रदेशातील हे गतिमान शहर गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे आणि आता हे शहर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक शहर आहे. इतर अनेक शहरी भागांप्रमाणेच, ठाणे शहराला वेगवान शहरीकरणाशी संबंधित आव्हाने आहेत. वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण आणि सार्वजनिक सेवांवरील ताण इ. अहवालानुसार, ठाण्यातील एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) १३० इतका जास्त नोंदविला गेला होता जो सामान्यत: “अनारोग्य” गटामधील श्रेणीमध्ये गणला जातो.

उत्खनन, रस्ते आणि इमारतीचे बांधकाम, जुन्या इमारती पडणे/पाडणे यामध्ये निर्माण होणारी धूळ, धूर /घन कण उत्सर्जित करणाऱ्या वाहनांच्या हालचालीं इत्यादीमुळे वायू-प्रदूषणाच्या गंभीर चिंतेमध्ये भर पडत आहे. येथील झोपडपट्टी भागातील, ५० हजाराहून अधिक रहिवासी समुदायांना, वारंवार वायू प्रदूषणाच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. ही खराब हवेची पातळी त्यांच्या पर्यावरणीय धोक्यांची असुरक्षितता वाढवते.

ठाणे स्थानकावरून दररोज अंदाजे सहा लाख प्रवासी ये-जा करतात आणि उच्च प्रवासी घनता आणि संबंधित क्रियाकलापांमुळे आजूबाजूच्या परिसराला वायू प्रदूषणाशी संबंधित महत्त्वपूर्ण आव्हानांना सामोरे जावे लागते.

ठाणे शहरात ५००-६०० सरकारी बस वाहतूक आणि १०० खाजगी बस वाहतूक या व्यतिरिक्त, परिसरात १,००० हून अधिक ऑटो-रिक्षा आणि ३०० हून अधिक टॅक्सी प्रदूषणाच्या पातळीत योगदान देतात.

ब्रेथलेस हा शब्द आता ठाणेकरांच्या जीवनाचे वर्णन करण्यासाठी वापरावा लागत आहे, जो शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर लक्ष देण्याची तातडीची गरज अधोरेखित करतो. ९०टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ज्या भागात वायू प्रदूषण पातळी उंचावत आहे अशा भागात राहत आहे. ठाणेकर हे अदृश्य विषारी प्रदूषक श्वास घेत आहेत जे त्यांच्या फुफ्फुसांना आणि दीर्घायुष्यासाठी गंभीर धोका निर्माण करु शकतात.

या महत्त्वपूर्ण समस्येचा सामना करण्यासाठी, आयआयटी मद्रासतर्फे त्यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) प्रकल्पांतर्गत शहरव्यापी हवेच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचे उत्पादन सायक्लोफाईन हे सभोवतालची हवा शुद्धीकरण यंत्र तयार केले आहे. हा प्रकल्प प्रा. एस.एम. शिवा नागेंद्र यांनी विकसित केला आहे ज्यात हवेची गुणवत्ता, निरीक्षण आणि वायू प्रदूषण नियंत्रण एकाच युनिटमध्ये एकत्रित केले आहे. हा प्रकल्प समुदाय आणि सामाजिक विकासाच्या उद्देशाने एनआयआयएफ-आयएफएलद्वारे प्रायोजित आहे आणि ‘एन्व्ही ट्रान’द्वारे कार्यान्वित केला जातो.

आयआयटी, मद्रासतर्फे आणि डॉ. व्ही. एन. ब्रिम्स, या ठाण्यातील प्रख्यात व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने ज्ञानव्दिप विद्यासंकुलात/ ठाणे कॉलेज परिसरात हा प्रकल्प उभारला आहे. याचे उद्घाटन मंगळवार, ६ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले.