लसणाची फोडणी महागली

किरकोळ बाजारात लसूण दोनशे पार

नवी मुंबई: बाजारात टोमॅटो, हिरवा वाटाणा आणि मिरचीच्या दरात स्पर्धा रंगली असताना लसणाने देखील भाव खाण्यास सुरुवात केली आहे. घाऊकमध्ये १८० रुपयांवर उपलब्ध असलेल्या लसणाने किरकोळ बाजारात द्विशतक पार केले आहे. २१०-२३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे जेवणातील फोडणी महाग झाल्याने गृहिणीच्या किचन बजेटला देखील महागाईची फोडणी बसत आहे.

वाशीतील कृषी उत्पन्न बाजारमधील कांदा-बटाटा घाऊक बाजारात लसणाचा दर १७५ ते १८० रुपये प्रतिकिलो दरावर पोहचला आहे. तर किरकोळ बाजारात २१०-२३० रुपयांपर्यंत लसणाने मजल मारली आहे.

एपीएमसी बाजारात राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशहून लसणाची आवक होते. यंदा लसुण लागवड कमी आहे. शिवाय समाधानकारक पाऊस नसल्याने मागील दोन महिन्यांपासून सातत्याने दर वधारत आहेत. एपीएमसी बाजारात नेहमी लसणाच्या १५ ते २० गाड्यांची आवक होते. मात्र बुधवारी अवघ्या सात गाड्या दाखल झाल्या आहेत. एप्रिलपासून उत्पादन कमी आहे, त्यामुळे बाजारात आवक घटली आहे. एप्रिल-मे मध्ये दरात किरकोळ वाढ झाली होती, मात्र जून-जुलैमध्ये दर कडाडण्यास सुरुवात झाली आहे.

आता जुलैमध्ये टोमॅटोपेक्षाही लसणाच्या दराने उच्चांक गाठला आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने उत्पादन घटत आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे. पावसाने पुढेही दडी मारली तर लसूण आणखीन महागण्याची शक्यता आहे, असे मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

मागील आठवड्यात उटी लसूण १३०-१६० रुपये आणि देशी लसूण ११५-१२५ रुपये तर किरकोळ बाजारात १८०-२०० रुपयांनी विक्री होत होता. मात्र बुधवारी एपीएमसीत उटी लसूण १४५-१८० रुपये तर देशी १२०-१५० रुपये तर किरकोळ बाजारात २१०-२३० रुपयांनी विक्री होत आहे.