ठाणे : भरवस्तीतील विहिरीत मगरीचे पिल्लू आढळल्याची घटना वागळे इस्टेट येथील रामनगर भागात आज घडली. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची एकच गर्दी विहिरीभोवती उसळली होती. या मगरीच्या पिल्लाला वन्यप्रेमींनी जीवदान दिले.
या पिल्लाला ताब्यात घेत त्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली. याठिकाणी या पिल्लाची तापासणी करून त्याला पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
वागळे इस्टेट येथील रामनगर भागात भर वस्तीत असलेल्या विहिरीत मगरीचे पिल्लू आढळले. या घटनेची माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी डब्ल्यूडब्ल्यूए या वन्यजीव बचाव संस्थेच्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. या टीममधील अभिजित मोरे, जीत गुप्ता, दीपक भांग्रत या स्वयंसेवकांनी मगरीच्या पिल्लाला ताब्यात घेतले. एक ते सवा महिन्याच्या या पिल्लाला कोणतीही दुखापत झाली नसून हे पिल्लू नजीकच्या डोंगरावरून आणून कोणीतरी विहिरीत सोडल्याचा अंदाज रोहित मोहिते यांनी व्यक्त केला.
या पिल्लाची तपासणी करण्यासाठी त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांच्याकडे नेण्यात आले. या तपासणीनंतर त्याला पुन्हा एकदा जंगलात सोडले जाणार असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी दिली.