मनपसंत घरांच्या खरेदीसाठी क्रेडाई एमसीएचआय प्रॉपर्टी सज्ज

ठाणे: ठाण्याच्या रिअल इस्टेट व्यावसायिकांसाठी २०२३ हे वर्ष `रॉकिंग’ ठरले होते. तर यंदाही अर्थव्यवस्थेला गती आल्यामुळे पूर्वीपेक्षाही अधिक विक्रमी घरखरेदी होईल, असा विश्वास क्रेडाई एमसीएचआय, ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केली.

ठाणे शहरात गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १,७२३ कुटुंबांनी नव्या घरामध्ये पहिले पाऊल टाकले होते. या कुटुंबांच्या दृष्टीने २०२३ हे वर्ष त्यांच्या जीवनातील स्वप्नांच्या घराचे मंगलमय पर्व ठरले होते. क्रेडाई एमसीएचआय, ठाणे संस्थेने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या एका दिवसाच्या आकडेवारीवरून २०२३ मध्ये गृहखरेदीला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे स्पष्ट होते.

क्रेडाई एमसीएचआय, ठाणेच्या प्रॉपर्टी प्रदर्शनाची विश्वासार्हता वाढत असल्यामुळे दरवर्षी नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शनाच्या चार दिवसात तब्बल २७ हजार कुटुंबांनी प्रॉपर्टी-२०२३ प्रदर्शनाला भेट दिली होती. त्यातील बहूसंख्य इच्छूक कुटुंबे व गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष बांधकाम साईटच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तर त्यातील १५०० जणांनी घर व व्यावसायिक जागांची नोंदणी केली होती. प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या माध्यमातून या खरेदीदारांना घरांचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला होता.

यंदा प्रॉपर्टी प्रदर्शनाने २१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या प्रदर्शनाने दरवर्षी नवी उंची गाठली होती. या वर्षाच्या प्रॉपर्टी प्रदर्शनातही घरखरेदीसाठी इच्छूक ग्राहकांना आकर्षक ऑफर मिळणार असल्यामुळे प्रदर्शनाबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. गुंतवणुकदारांसाठी मालमत्तेत गुंतवणूक महत्वाची आहे. ठाणे शहराने दरवर्षी उत्तम परतावा दिला आहे. तर आकर्षक घरभाडेही गुंतवणूकदारांना मिळाले. त्यामुळे यंदाच्या प्रदर्शनात गुंतवणुकीसाठी अनेक पर्यायांचा विचार करता येईल. त्यामुळे यंदाचे प्रदर्शन हे ग्राहक व गुंतवणूकदारांसाठी अनोखी संधी निर्माण करणारे ठरेल.

गेल्या काही वर्षांत २०२३ हे वर्ष घरखरेदीचा विक्रम नोंदविणारे ठरले होते. रिअल इस्टेटमधील ही तेजी यंदाही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्याच्या रिअल इस्टेट व्यवसायाची परंपरा झालेल्या क्रेडाई एमसीएचआय, ठाणेचे प्रॉपर्टी प्रदर्शन – २०२४ मध्ये नवा विक्रम प्रस्थापित होऊन, ठाणेकर घरांचा उत्सव साजरा करतील, अशी अपेक्षा आहे. ठाणे पश्चिम भागातील पोखरण रोड क्रमांक १ वरील रेमंड मैदानावर १६ ते १९ फेब्रुवारीपर्यंत होणारा हा उत्सव शेकडो कुटुंबाच्या ‘स्वप्नातील घर’ सत्यात उतरेल.

या प्रदर्शनामध्ये आघाडीच्या बांधकाम व्यावसायिकांकडून रेडी टू मूव्ह इन अपार्टमेंट, बूकिंग ऑफर्स, ग्राहकांच्या सोयीनुसार व बजेटनुसार फ्लेक्झिबल पेमेंट स्किम सादर केल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना घरखरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टी प्रदर्शनानंतर पुढील काही आठवड्यात बांधकाम व्यावसायिकांकडे बुकिंगला वेग येईल, असा विश्वास बांधकाम व्यावसायिकांना वाटत आहे.
यंदा मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिक व ठाणेकरांनी अनेक वर्षांची विश्वासार्हता असलेल्या प्रतिष्ठीत प्रॉपर्टी-२०२४ ला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन जितेंद्र मेहता यांनी केले आहे.