देशातील पहिला दिव्यांगपूरक सिग्नल ठाण्यात

ठाणे: वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग आणि दृष्टीहिनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. वाहतुक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधुन ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा कार्यन्वीत करण्यात येणार आहे. अशी माहिती वाहतुक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.

ठाण्यात नागरीकरणासोबतच वाहनांची संख्या वाढत आहे. तीनहात नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूरबावडी-माजिवडा अशा मुख्य चौकात एकाचवेळी अनेक रस्त्यांवर वाहने येतात. या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी डोळस व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अडचणींना तोंड द्यावे लागते. दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतात. त्यामुळे दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे. यात रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या धर्तीवर बीपर असणार असून जिथे चढ-उतार असतील तिथे छोटे-छोटे रॅम्प केलेले असून तेथील पोलवर हे बीपर असणार आहेत.