आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अधिकारी-ठेकेदारांवर आरोप
ठाणे : अधिकारी आणि ठेकेदारांना नालेसफाई करायची नसून केवळ हात की सफाई करायची आहे, त्यामुळेच ठाण्याचे वाटोळे झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
नालेसफाई 20 टक्के दराने कमी कशी करून घेऊ शकता, कोणता चांगला ठेकेदार तुमच्या नालेसफाईसाठी येईल असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाई नेमकी किती टक्के झाली आहे? नालेसफाई पूर्ण झाली आहे की नाही? याबाबत कोणताच दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर्षीही नालेसफाईबाबत शंका व्यक्त होत आहे. दिव्यात तर नालेसफाईचा अक्षरशः बोजवारा उडाला असून या ठिकाणी नालेसफाई झाली कि नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्याच्या नालेसफाईवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पालिका अधिकारी आणि ठेकेदारांवर गंभीर आरोप केले आहेत.
ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे, मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर यावर्षी 80 पैसे टेंडरमध्ये भाव देण्यात आला. एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसे होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नालेसफाईचे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये कार्यादेश द्यायला हवा, त्यामुळे नालेसफाईला वेळ मिळतो. मात्र तसे केले जात नाही. नालेसफाईमध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत आहे. यांची नालेसफाई म्हणजे हाथ की सफाई असून या भ्रष्टाचाराच्या पोटी ठाण्याचे वाटोळे होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. अनधिकृत इमारती नाल्यावर बांधल्या गेल्या आहेत, अनेक ठिकाणी भरणी केली गेली आहे, महापालिकेचे अधिकारी झोपतात काय? नाले सफाईसाठी फक्त बिल्डरांना मार्ग कसा मोकळा करून देता येईल याकडेच लक्ष असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.