रंगायतनच्या नूतनीकरणासाठी विना निविदा सल्लागार नियुक्त!

मर्जीतील सल्लागारासाठी महापालिका मोजणार २१ लाख

ठाणे: राम गणेश गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरु असून, त्यासाठी कोणतीही निविदा न काढता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या सल्लागाराला महापालिका २१ लाख रुपये मोजणार आहे. यापूर्वीही अनेक कामांमध्ये अशाच प्रकारे सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप पालिका प्रशासनावर झाल्यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

राम गणेश गडकरी रंगायतनची इमारत साधारणतः ४० वर्षे जुनी असून या इमारतीमध्ये संरचनात्मक दुरुस्ती करुन नुतनीकरण करण्यासाठी तालिकेवरील सल्लागार मे. हितेन सेठी अॅण्ड असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणासाठी २३.५० कोटी निधी शासनाकडून प्राप्त झालेला आहे. नूतनीकरणाच्या कामात अस्तित्वातील इमारतीचा व परिसराचा सर्व्हे करणे, तज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली संरचनात्मक दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, अस्तित्वातील वास्तुला धोका न पोहचवता इमारतीच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणे व त्यासाठी लागणाऱ्या कामांचे अंदाजखर्च बनविणे इत्यादी बाबी करणार आहे. त्याअनुषंगाने सल्लागार मे. हितेन सेठी अँड असोसिएट्स यांनी नुतनीकरण करावयाच्या कामाचे नकाशे, आराखडे व अंदाजखर्च तयार केले आहेत.

नूतनीकरणाच्या कामासाठी २६.९४ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. नूतनीकरणाच्या कामाचे अंदाजखर्च, नकाशे व आराखडे तयार करणेकरिता मे. हितन सेठी अँड असोसिएटस यांना २१ लाख ५९ हजार रुपये मोबदला द्यायचा आहे. ही नियुक्ती करताना कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात आली नसल्याने कोणाच्या शिफारशीने सल्लागार नेमण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.