अंबरनाथ: अंबरनाथचे शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे वृत्त समोर आले आहे. खुद्द आमदार डॉ. किणीकर यांनीच या वृत्ताला दुजोरा देत त्याबाबत माहिती दिली आहे.
आमदार डॉ. किणीकर यांची हत्या करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून याबाबत व्यूव्हरचना सुरू होती. ठाण्याच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या प्रकरणी चौकशी केली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या प्रकरणात आधीपासूनच चौकशी करत असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे डॉ. किणीकर यांनी सांगितले आहे.
पोलिस यंत्रणेवर माझा विश्वास असून या प्रकरणाची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचेही डॉ. किणीकर यांनी सांगितले. माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती काही सूत्रांकडून मला मिळाल्याचे आमदार किणीकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.