ठाण्यासह जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा

पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत काँग्रेसचा निर्णय

ठाणे : महाविकास आघाडीच्या जागावाटप चर्चेत ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर विधानसभा मतदारसंघासह पाच जागांची मागणी काँग्रेस करणार असल्याचे काल झालेल्या काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निश्चित झाले आहे.

काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली होती त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १८ जागांपैकी ठाणे शहर, भिवंडी पश्चिम, अंबरनाथ, मीरा-भाईंदर आणि मुरबाड या पाच मतदारसंघांवर दावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पाचही मतदारसंघ सध्या भाजपाच्या ताब्यात आहेत. या मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे या मतदारसंघावर दावा करण्याचे बैठकीत ठरले असून जागा वाटपाची बोलणी होतील तेव्हा या पाच जागा पदरात पाडून घ्यायच्या, असे देखिल निश्चित झाले आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याचे समजते तर मीरा-भाईंदर या मतदारसंघातून मुजफ्फर हुसेन यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. भिवंडी मतदार संघाची उमेदवारी अल्पसंख्यांक समाजाच्या काँग्रेस कार्यकर्त्याला देऊन ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. या पाच मतदार संघातून विधानसभेवर काँग्रेसचे प्रतिनिधी पाठवले जातील, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे पाचही मतदारसंघ आघाडीच्या ताब्यात नाहीत, त्यामुळे जागा वाटपामध्ये या जागा काँग्रेसला मिळतील, असा विश्वास काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केला.