वास्तू विशारदांचे स्नेहसंमेलन
ठाणे: ‘धि इंडियन इंस्टिटयूट ऑफ आर्किटेक्ट्स’ या वास्तुविशारदांच्या देशव्यापी संस्थेच्या, महाराष्ट्र चॅप्टरच्या ठाणे केंद्रातर्फे 21 जानेवारी 2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक, तीन हात नाका, ठाणे येथे करण्यात आले होते.
“कॉनफ्ल्यूअन्स” म्हणजेच “कल्पना, विचार आणि उर्जा यांचा संगम” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून आयोजित या संमेलनामध्ये महाराष्ट्र चॅप्टरच्या कार्यकारी समितीची बैठक, छायाचित्रण आणि रेखाचित्रण स्पर्धेचं प्रदर्शन, सुप्रसिध्द वास्तुविशारदांची व्याख्यानं, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षिस वितरण समारंभ अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता.
संस्था देशभरातील वास्तु विशारदांच्या माध्यमातून वास्तुकलेमध्ये सौंदर्यदृष्टीबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि व्यावहारिक कार्यक्षमता वाढावी यासाठी प्रयत्न करत असते, तसंच वास्तुशास्त्रामधील शैक्षणिक सुधारणांकरिता सतत कार्यरत असते. संस्थेचे ठाणे केंद्रदेखील त्याच्या स्थापनेपासून गेली 37 वर्षे, शहरातील वास्तुविशारदांचं प्रतिनिधित्व करताना त्यांचे प्रश्न, समस्या यांचा पाठपुरावा करत आहे. तसंच विकास आराखडा अंमलबजावणी, बांधकाम नियमावली, त्यातील सुधारणा यामध्ये भरीव योगदान देत आहे. ‘वास्तुकला व्यवसायाचं संवर्धन’ या संस्थेच्या मूळ उद्दीष्टाला अनुसरुन ठाणे केंद्रामार्फत विविध उपक्रमांचे, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच प्रयत्नांचे पुढचे पाऊल म्हणून राज्यव्यापी समितीची बैठक तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ वास्तुविशारद तसेच वास्तुकलेचे विद्यार्थी अशा सुमारे 300 व्यावसायिकांचे संमेलन ठाणे केंद्रातर्फे यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. त्याला राज्यभरातील आणि ठाणे शहरातील वास्तुविशारद आणि विद्यार्थी यांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.
या यशस्वी संमेलनाला वेगळी उंची प्राप्त झाली ती महाराष्ट्राच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे. ठाणे शहरातील आणि राज्यभरातून उपस्थित असलेल्या वास्तुविशारदांतर्फे आय.आय.ए. ठाणे केंद्राचे अध्यक्ष मकरंद तोरसकर, केंद्रीय समिती सहसचिव सतीश माने, राज्य समितीचे अध्यक्ष संदीप बावडेकर, सचिव प्रदीप काळे, खजिनदार संदीप प्रभु यांनी मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार केला. याप्रसंगी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचाही सन्मान करण्यात आला.
संस्थेतर्फे मकरंद तोरसकर यांनी संस्थेच्या उद्दीष्टांची व कार्याची माहिती दिली, तसेच वास्तुविशारदांचे प्रश्न, समस्या याकडे लक्ष वेधले. त्याचवेळी राज्याच्या विकासामध्ये सर्व वास्तुविशारदांचं शासनाला पूर्ण सहकार्य कायम असल्याची शाश्वती दिली. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री महोदयांनी वास्तुविशादांच्या सर्व समस्या समजावून घेऊन त्यांचं त्वरीत निराकरण करण्याची ग्वाही दिली आणि आपल्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत उपस्थितांशी संवाद साधला. शहरांच्या आणि पर्यायाने राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये वास्तुविशारदांच्या योगदानाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचा उत्साह वाढवला. मुख्यमंत्री महोदयांच्या आश्वासक उद्गारांकरीता उपस्थित समस्त वास्तुविशारदांनी त्यांचे आभार मानले.