येऊरमधील आदिवासी महिलांचा टाहो
ठाणे: येऊरच्या आदिवासी पाड्यात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झालेली असून त्यात पाणी, वीज आणि कडीकोयंडे नसल्याने महिला वर्गाची कुचंबणा होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली येऊरमधील आदिवासी महिलांनी वर्तकनगर प्रभाग समितीवर मोर्चा काढला होता.
येऊरमध्ये शौचालयाची दयनीय अवस्था झाली आहे. या भागात असलेल्या सातपैकी पाच शौचालये नादुरुस्त अवस्थेत आहेत. एकीकडे स्वच्छतेच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च सुरू असताना येऊर परिसरातील शौचालयांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या संदर्भात महापालिकेकडे वारंवार विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसून वर्तक नगरमधील प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात.असल्याचा आरोप महिलांनी केला.
शिवसेनेचे उपशहर प्रमुख भास्कर बैरी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर प्रभाग समितीवर स्थानिक महिलांना सोबत घेऊन धडक देण्यात आली. यावेळी प्रशासनाने उद्याच या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येऊ आणि तत्काळ प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.
लोकप्रतिनधी अस्तित्वात नसल्याने पालिका अधिकाऱ्यांचे फावले आहे. शौचालय दूरावस्था संदर्भात अनेकदा अधिकाऱ्यांना फोन करून देखील दखल घेत नव्हते. म्हणून या परिसरातील महिलांना सोबत घेऊन प्रभाग समितीवर धडक दिली. शौचालयाची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांनी दिली. एका आठवड्यात दुरूस्ती हाती घेतली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालिका प्रशासनाला देण्यात आला आहे, अशी माहिती भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली.