निवडणूक घोटाळा लपवण्यासाठी आयोगाच्या अधिकाऱ्यांचा खटाटोप

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

ठाणे : विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदान याविषयी नवनवीन घोटाळे बाहेर येत आहेत. संध्याकाळी ६ नंतर अचानक वाढेलेला मतदानाचा टक्का सर्वांना अचंबित करून टाकणारा असून निवडणूकीचा हा घोटाळा लपवण्यासाठी १७ अ फॉर्म ४५ दिवसांनी दिला जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत १७ अ हा फाॅर्म अतिशय महत्वाचा आहे. या फाॅर्ममध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून दर दोन तासाला झालेले मतदान आणि इतर सर्वच तांत्रिक माहिती भरून त्याची नोंदणी नोंदवहीत करण्यात येत असते. तसेच, १७ सी वरून मतदानाची आणि मतदारांची माहिती दोन टप्प्यांत नोंद केली जाते. असे असतानाही सायंकाळी सहानंतर झालेली मतांची बेसुमार वाढ अशक्य आहे. शिवाय, झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदान यामध्ये तफावत आहे. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी १७ अ आणि १७ सी ही दोन कागदपत्रे अतिशय महत्वपूर्ण आहेत. मात्र,निवडणूक अधिकारी हीच कागदपत्रे ४५ दिवसांनी म्हणजेच कोर्टात दाद मागण्याची मुदत संपल्यानंतर देणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. एकूणच घोटाळा लपवण्यासाठी १७ अ दिला जात नाही ना? अशी शंका उपस्थित करून राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सर्व तांत्रिक बाजू उघडकीस आणल्या.