आ. जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा? राष्ट्रवादी आक्रमक; मुंब्र्यात तणाव

विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी तीव्र पडसाद

ठाणे : माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढतच असून हर हर महादेव चित्रपट प्रकरणानंतर मुंब्र्यातील एक महिलेच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत आव्हाड यांनी आज व्यथित होत आमदारकीचा राजीनामा दिला. दरम्यान मंगळवारी सुनावणी होईपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने सांगितले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते रविवारी ठाण्यात दोन उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रथम कळवा पूल व त्यानंतर मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित एका महिला भाजप पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि या महिला समोरासमोर आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. मात्र या महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच आव्हाड यांनी व्यथित होत आमदारकीचा राजीनामा दिला. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते यांनी ठाण्यात धाव घेत श्री.आव्हाड यांची भेट घेतली. गुन्हा चुकीचा असल्याचे सांगून त्यांनी राजीनामा देऊ नका अशी गळ घातली. पत्रकार परिषदेत श्री.आव्हाड भावुक झालेले दिसले.

कार्यकर्ते झाले आक्रमक

आव्हाड यांच्यावरील गुन्ह्याचे आणि राजीनाम्याची पडसाद मुंब्र्यात उमटले. संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा बायपासवर सकाळी जाळपोळ केली. सकाळीच हा प्रकार झाल्याने बायपासवर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान वाहतूक पोलिसांनी आंदोलकांना हटवून बायपास वाहतुकीसाठी खुला केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी सहा पासूनच मुंब्रा पोलीस ठाण्याच्या बाहेर जमण्यास सुरवात केली. संतप्त झालेल्या या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी थेट मुंब्रा पोलीस ठाण्याच्या बाहेर १५ ते २० रिक्षा थांबवून हा मार्ग अडवून ठेवला. कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहता मुंब्रा पोलीस ठाण्यात पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त मुंब्र्यात पसरताच संपूर्ण शहर सोमवार सकाळपासून बंद ठेवण्यात आले. सकाळी कोणतीच दुकाने, हॉटेल उघडण्यात आली नव्हती. शहरातील रिक्षा सेवाही बंद होती. त्यानंतर साडे अकराच्या सुमारास जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल झाल्या. तेव्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात आतील बाजूस बसलेले राष्ट्रवादीचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते रस्त्यावर आले. तिथेच या सर्वांनी ठिय्या देत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही बाजूचे मार्ग पूर्ण बंद करण्यात आले होते. तर कळवा येथे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुपारी एकच्या सुमारास निदर्शने केली.