प्रामाणिकपणाचे आढळले खणखणीत ‘नाणे’

ठाणे : बँकेच्या लॉकरमधून पडलेले सोन्याचे नाणे ग्राहकाला परत करण्याची घटना ठाण्यात घडली असून आजही समाजात अशी प्रामाणिकपणाची खणखणीत नाणी असल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

या प्रकरणातील एक ज्येष्ठ नागरिक महिला दमाणी इस्टेट परिसरातील ॲक्सिस बँकेत लॉकरचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या हातून त्यावेळी सोन्याचे नाणे पडले. त्यांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांना सापडले नाही. त्या काहीशा हताश होऊन गेल्या. आणि पुढे पुण्यास रवाना झाल्या.

दोन दिवसांनी बँकेतून नाणे सापडल्याचा फोन आला. या ज्येष्ठ महिला पुण्याहून ठाण्यात आल्या. आणि त्यांनी ओळख पटवून नाणे ताब्यात घेतले. हे नाणे या महिलेच्या मुलाला त्याच्या मामाने परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल भेट दिले होते. त्यामुळे त्या मागे भावना होत्या, असे या महिलेने सांगितले.

नाणे परत देणारा तरुण कर्मचारी जॉय परक्कल आणि चारू यांचे या महिलेने आभार मानले.