कोचिंग क्लासेस संघटनेच्या साडेसात हजार पदवीधर सदस्यांमुळे रंगत

अमोल जगताप यांनी दाखल केला अर्ज

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील यंदाची निवडणूक कोचिंग क्लासेस संघटनेच्या प्रवेशामुळे रंगतदार झाली आहे. कोचिंग क्लासेस संघटनेचे सुमारे साडेसात हजार पदवीधर सदस्य या निवडणुकीत सक्रीय झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून गुरूवारी कोचिंग क्लासेसचे अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
ठाण्यात कोकण पदवीधर निवडणूकिसाठी कोचिंग क्लास संघटनेच्या वतीने अमोल जगताप यांना उमेदवारी देण्यात आली असून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि रोजगार निर्मिती करणे यांसारखे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला अर्ज दाखल करण्याआधी जगताप यांनी कोर्टनाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, शैलेश सपकाळ भरत जाधव बबन चव्हाण संचालक शिक्षक उपस्थित होते. सदर प्रसंगी त्यांनी, शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी याबाबत विधिमंडळात आवाज उठवण्यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे सांगितले.

दरम्यान, गेल्या सहा महिन्यापूर्वी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने नऊ हजार तरुण पदवीधर यांचे अर्ज भरून त्यांचा समावेश मतदार म्हणून करून घेतला आहे. शिवाय, हजारो माजी विद्यार्थी यांना संपर्क साधण्यात आलेला आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी, महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खासगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करीत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत आहे. मात्र, त्यांच्या रोजगार बाबत कोणीही बोलत नाही. पदवीधर याच्या समस्यांबाबतही कोणताही विचार केला जात नाही. पदवीधरांना केवळ गृहीत धरण्यात येते. त्याविरोधात आमचा लढा आहे, असे सांगितले.