प्रदूषणात शहरे घुसमटली

ठाणे : नव्या वर्षातही हवेचे प्रदूषण कायम असून ठाणे, बदलापूर, उल्हासनगर आणि भिवंडी या शहरांच्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत या शहरांतील हवेचा निर्देशांक २०० ते ३०० पर्यंत असल्याचे आढळले आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानेच प्रशासनाला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ठाणे महापालिकेने प्रदूषणाबाबत नियमावली तयार केली असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासही सुरुवात केली आहे. यामध्ये प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात लाखो रुपयांचा दंड देखील आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे. मात्र एवढ्या उपाय योजनांवर समाधान न मानता पालिकेच्या वतीने कारवाई सुरूच ठेवण्यात आली आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे दिसून आले होते. आता जानेवारीच्या पहिल्या तीन दिवसातही हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम धोका आणि वाईट प्रकारातच असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ॲपमधून समोर आले आहे. यात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि बदलापूर या शहरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरला आहे. बदलापुरात या तीन दिवसात सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० म्हणजे वाईट दर्जाचा होता. तर उल्हासनगर शहरात सरासरी निर्देशांक २३० इतका होता. भिवंडीत हाच निर्देशांक सरासरी २२० इतका होता. तर ठाणे शहरात कासारवडवली येथील हवा तपासणी केंद्रात सरासरी १६० तर उपवन येथील केंद्रात सरासरी २६० निर्देशांक नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हवा तपासणी केंद्र आहेत, त्या त्या ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरल्याचेच दिसून आले आहे.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रस्ते धुवून त्यावरील धूळ कमी करणे, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विशिष्ट नियमावलीची अमलांबजावणी करण्याची सक्ती करणे, कचरा, धूळ कमी करण्यासाठी उपययोजना करणे अशा गोष्टी करण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर उतरून सखोल स्वच्छता मोहीम राबवत आहेत. तशाच सूचना ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या पालिकांना देण्यात आल्या आहेत. कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ यासारख्या नगरपालिकांनाही अशाच सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सूचनांचे पालन होत असले तरी त्यामुळे हवेचा निर्देशांक जिल्ह्यात सुधारत असल्याचे दिसून येत नाही.