घरांच्या किमती ३५ लाखापर्यंत महाग
नवी मुंबई: शेकडो सिडको सोडतधारकांनी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. सिडको सोडतधारकांनी राज ठाकरेंना ईडब्ल्यूएस घरांचे दर अवाजवी कसे वाढवले हे पटवून दिले. तसेच सिडकोने जाहिरात काढताना ३१० चौ. फूट घर देणार असे म्हटले होते. पण प्रत्यक्षात सिडको २९० चौ. फूटाचे घर देत आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून हा विषय धसास लावू, असे आश्वासन यावेळी राज ठाकरे यांनी दिले.
पंतप्रधान आवास योजनेतील ७८४९ घरांची लॉटरी काढताना सिडकोने अत्यल्प उत्पन्न गटातील सोडत धारकांना उलवे नोड येथे ३५ लाखांच्या किमतीत घरांचे दर ठेवल्याने हे दर कमी करावेत, म्हणून सिडको सोडतधारक महिना भरापासून लढा देत आहेत. या प्रश्नांसंदर्भात ६ एप्रिल रोजी सिडको सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांची भेट घेतली. ८ एप्रिलला ट्विटरवर #CidcoOverPricedHomes या हॅशटॅगची मोहीम चालवली. या मोहिमेअंतर्गत पाच हजारपेक्षा जास्त ट्विट करून सोडतधारकांनी आपला निषेध सिडकोकडे नोंदवला. तरीही सिडकोने या प्रश्नाची दखल घेतली नाही. त्यामुळे मनसेने १२ एप्रिलला सिडको विरोधात “भीक मागा” आंदोलन केले होते.