२५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ
नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे २७ ऑगस्ट २०२४ रोजी सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती, व्हॅलीशिल्प आणि वास्तूविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील ६८९ सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सिडको महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आता, सदर गृहनिर्माण योजनेंतर्गत १९० अतिरिक्त सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून सदर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यास २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सिडकोतर्फे २७ ऑगस्ट २०२४ रोजी प्रारंभ करण्यात आलेल्या ऑगस्ट २०२४ गृहनिर्माण योजने अंतर्गत सिडकोच्या खारघर नोडमधील स्वप्नपूर्ती, व्हॅलिशिल्प आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील ६८९ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटांकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यांपैकी, स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता ९३, वास्तूविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील मध्यम उत्पन्न गटाकरिता ४६ आणि उच्च उत्पन्न गटाकरिता ५१ अतिरिक्त सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे आता स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता एकूण १३५, वास्तूविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलातील मध्यम उत्पन्न गटाकरिता एकूण ५६ आणि उच्च उत्पन्न गटाकरिता एकूण ७४ सदनिका उपलब्ध झाल्या आहेत.
या सदनिकांकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यास २५ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत व अनामत रकमेचा भरणा करण्याकरिता ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून संगणकीय सोडत १३ नोव्हेंबर २०२४ रोजी ११ वाजता पार पडणार आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी, सुधारित वेळापत्रक व योजनेचा सविस्तर तपशील जाणून घेण्याकरिता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेसोबतच घणसोली, खारघर व कळंबोली येथील सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. सदर योजनेतील संगणकीय सोडत पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच १० ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडेल अशी माहिती सिडकोच्या वतीने देण्यात आली आहे.