चिनी लसूण अफगाणमार्गे एपीएमसीत होतोय दाखल

मोठ्या भरीव पाकळ्यांमुळे हॉटेल चायनीज सेंटरकडून मोठी मागणी

नवी मुंबई : भारतात बंदी असलेला चिनी लसूण आता अफगाणिस्तानच्या नावाखाली वाशीतील एपीएमसीमध्ये दाखल होत आहे. हा लसूण देशी लसणापेक्षा मोठा आणि भरीव असल्याने हॉटेल व्यवसायिकांकडून अधिक मागणी होत आहे.

भारतीय कृषीमालाच्या विक्रीवर परिणाम होऊ नये म्हणून मागील काही वर्षांपासून चीनमधील कृषीमालाची आयात थांबवली आहे. त्यात लसणाचा देखील समावेश आहे. मात्र मागील दोन-तीन महिन्यांपासून भारतातील लसणाचे उत्पादन घटल्याने घाऊक बाजारात लसूण तीनशे तर किरकोळ बाजारात चारशेच्या घरात पोचला आहे. त्यामुळे लसणाचे वाढते दर पाहता काही आयातदार व्यापाऱ्यांनी अधिक नफा मिळावा म्हणून एपीएमसी बाजारात चिनी लसणाची विक्री सुरू केली आहे.

आधी हा लसूण नेपाळमार्गे भारतात दाखल होत असे. मात्र आता आयातदारांनी नवीन शक्कल लढवली आहे. चीनमधून लसूण प्रथमतः अफगाणिस्तानमध्ये मागवला जातो. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये लसूण उतरल्यानंतर हाच लसूण अफगाणी लसूण म्हणून तेथील कागदपत्रांच्या आधारे बंदरात दाखल होतो आणि वाशीतील एपीएमसी प्रशासनाची दिशाभूल करत बाजारात विक्रीसाठी दाखल होतो.

हॉटेल व्यवसायिक आणि चायनीज खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांकडून या स्वस्त अफगाणी लसणाला मागणी आहे. घाऊक बाजारात चिनी लसूण प्रतिकिलो २५० ते ३०० रुपये तर देशी लसूण २२० ते ३०० रूपयांवर विक्री होत आहे. त्यामुळे बाजार समितीने अशा प्रकारे दाखल होत असलेल्या चिनी लसणाचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी केली आहे.