चिखलोली धरण ओव्हर फ्लो; अंबरनाथची पाणी-चिंता दूर

अंबरनाथ : जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावली आणि मागील महिन्यात तळ गाठलेले चिखलोली धरण बरोबर एक महिन्यात ओसंडून वाहू लागल्याने अंबरनाथवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारपासून जोर धरलेल्या पावसाने अंबरनाथच्या जांभिवली परिसरातील चिखलोली धरण शनिवारी रात्रीनंतर ओव्हर- फ्लो झाले आहे. या धरणातून शिवाजीनगर, महालक्ष्मी नगर परिसरातील अंदाजे 50 हजार लोकवस्तीला सहा दललि पाणी पुरवले जाते, याशिवाय बदलापूरच्या बॅरेज, एमआयडीसीमार्फत 28 एमएलडी असे अंदाजे 34 एमलडी पाणी पुरवले जाते.

मागील महिन्यात धरणातील जलसाठा कमी झाल्याने तळ गाठला होता, मात्र त्यानंतर अंबरनाथ शहरासह धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने चिखलोली ओसंडून वाहू लागले आहे. चिखलोली धरणाची उंची 23.40 असून पाणी साठवण क्षमता 2.26 दलघमि इतकी आहे.