भाईंदर: भाईंदर पश्चिमेच्या उपनिबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक अली हैदर शेख याला २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
ठाणे लाचलुचपत विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील तक्रारदार यांचे सोसायटीचे विरूध्द नोटीस काढण्याकरीता, प्रशासक नेमण्याकरीता आणि सोसायटीचे लेखापरिक्षण करण्याकरीता लोकसेवक मुख्य लिपिक अली हैदर शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत ठाणे लाच लुचपत विरोधी विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने २८ ऑगस्ट २०२३ रोजी पडताळणी केली. त्यावेळी लोकसेवक अली हैदर शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्याविरूध्द लाचेच्या सापळ्याचे आयोजन करून त्यांना तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती ४५ हजार रूपये लाचेच्या रकमेचा स्विकार करणार असल्याचे मान्य केले. लाचेच्या रक्कमेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजार रूपये स्विकारताना मंगळवार २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे तालुका भाईंदर, पश्चिम याठिकाणी स्विकारली असतांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन थोरात, सहायक पोलीस उपनिरीक्षक भावसार, पोलीस हवालदार तारी, पोलीस नाईक पारधी, ठोंबरे, सांबरे यांनी केली.