मोटरमनच्या अंत्यविधीला गेले; अतिरिक्त काम करण्यास नकार; मध्य रेल्वेच्या १००हून अधिक फेऱ्या रद्द

मुंबई : लोकल अपघातात मृत्यू झालेल्या मोटरमनच्या अंत्यविधीला जाण्यासाठी अन्य मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना आज शनिवारी मनस्ताप सहन करावा लागला आहे.

मोटरमन नसल्याने मुख्य आणि हार्बर मार्गावरील ८४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. दुपारच्या अडीच वाजेपासून हा गोंधळ सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. तर १००हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी रेल्वे सिग्नल धोकादायक पद्धतीने ओलांडल्यामुळे त्यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू होती. अशातच सॅंडहर्स्ट रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान रेल्वे अपघातात त्यांचा काल शुक्रवारी मृत्यू झाला. शर्मा यांच्या पार्थिवावर आज शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, त्यांचे नातेवाईक येणार असल्याने अंत्यसंस्काराची वेळ सायंकाळी ५ वाजता ठेवण्यात आली. शर्मा यांच्या अंत्यसंस्काराचे कारण देत मुख्य आणि हार्बरमार्गावरील शेकडो मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिला.