यंदा घरगुती १२५ तर सार्वजनिक सात माघी उत्सवांची भर
ठाणे : भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सव देखिल गणेशभक्त मोठ्या उत्साहात साजरा करणार असून मागील वर्षापेक्षा यावर्षी सार्वजनिक सात तर घरगुती गणेशोत्सवात १२५ने वाढ झाली आहे. पुढील दहा दिवस बाप्पा भक्तांच्या घरात निवास करणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात सार्वजनिक १२९ गणेश मंडळांनी आयोजन केले आहे. मागील वर्षी १२२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आयोजन केले होते. घरगुती गणेशाची १४७२ भक्तांनी प्राणप्रतिष्ठापना केली आहे. मागील वर्षी १३४७ भक्तांनी गणपती घरी बसवले होते.
लोकमान्यनगर येथील लोकमान्य नगरचा राजा आणि श्री गणेश मंदिर ट्रस्ट, नौपाडा येथील उमा नीलकंठ व्यायाम शाळा हे ठाण्यातील जुने माघी गणेशोत्सव मंडळ आहेत. पाचपाखाडी येथे यावर्षी वंदे मातरम मंडळाने पहिल्यांदा माघी गणेशोत्सव आयोजित केला आहे.
उद्या गणरायाचे आगमन होणार असून दीड दिवसाच्या बाप्पाचे २६ जानेवारी रोजी विसर्जन केले जाणार आहे. पाच दिवसाच्या बाप्पाला २९ जानेवारीला निरोप दिला जाणार आहे तर दहा दिवसांच्या बाप्पाला ३ फेब्रुवारी रोजी वाजतगाजत निरोप दिला जाणार आहे. ज्याप्रमाणे भाद्रपद महिन्याच्या गणेशोत्सवामध्ये जल्लोष असतो तशाच प्रकारे यावेळी देखील जल्लोष ठाण्यात पाहण्यास मिळेल, असे अनेक भक्तांनी सांगितले.