टिटवाळा उपविभागातील १८४ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल

४४ लाखांची वीजचोरी उघड

ठाणे : ‘महावितरण’च्या टिटवाळा उपविभागातील सर्वाधिक गळती असलेल्या वीज वाहिनीवर गेल्या दीड महिन्यात केलेल्या तपासणीअंतर्गत १८४ जणांकडे ४४ लाख रुपयांची वीज चोरी आढळली. या सर्व १८४ जणांविरूद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा आणि कल्याण मंडळ दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या दीड महिन्यांच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.

मांडा-टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत टिटवाळा मंदिर, बल्याणी, बनेली, मांडा पश्चिम भागात १३४ तर गोवेली शाखेच्या अंतर्गत म्हारळ व वरप भागात ५० जणांकडे वीजचो-या आढळल्या. यात वीज बिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ४० ग्राहकांचा समावेश आहे.

टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहाय्यक अभियंते धनंजय पाटील, तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंते सचिन पवार, अलंकार म्हात्रे आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केली.