आरोग्यसेवा क्षेत्रातील करिअर संधी : उज्ज्वल भविष्याची दिशा

आरोग्य हे व्यक्तीचे, समाजाचे आणि राष्ट्राचे भविष्य ठरवते. वाढत्या लोकसंख्येच्या आणि रोगांच्या वाढत्या प्रमाणामुळे या हेल्थकेअर [आरोग्यसेवा] क्षेत्रातील करिअरचे महत्त्वही वाढले आहे. भारतात आरोग्य सुविधा अनेक पटींनी वाढल्या आहेत. आरोग्यसेवेचा फोकस बदलला आहे. आरोग्यसेवेचे लक्ष्य रोग आणि त्यांचे प्रतिबंध यावर आहे. बहुतेक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी 12 वी विज्ञान आणि प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

आरोग्यसेवा क्षेत्र हे केवळ डॉक्टरांपुरते मर्यादित नाही तर, यामध्ये अनेक विविध पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी आहेत. या क्षेत्रात प्रशासक, थेरपिस्ट, कायरोप्रॅक्टर्स, पॅरामेडिक्स आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांचादेखील समावेश आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील काही पर्याय खालीलप्रमाणे आहेत:

१) वैद्यकीय

ॲलोपॅथी: ॲलोपॅथी हा आरोग्यसेवा क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा व्यवसाय आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी “बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी” एमबीबीएस ही पदवी अत्यावश्यक आहे. एमबीबीएस शिक्षणानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात [संबंधित प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर] विशेषज्ञ होण्यासाठी एमडी किंवा एमएसचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये विविध विशेषज्ञता पर्याय उपलब्ध आहेत. जसे की सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, मेंदूविज्ञान, डर्मॅटोलॉजी आणि इतर वैद्यकीय शाखा.

आयुर्वेद: आयुर्वेद शास्त्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीएएमएस म्हणजेच “बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी” एक महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. आयुर्वेद हे भारताचे प्राचीन औषधशास्त्र आहे, जे शरीर, मन, आणि आत्मा यांच्या संतुलनावर आधारित आहे. बीएएमएस अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना आयुर्वेदाच्या विविध शाखांचे सखोल शिक्षण दिले जाते. ज्यामध्ये हर्बल औषधे, पंचकर्म, योग आणि निसर्गोपचार यांचा समावेश होतो. त्यांना आयुर्वेदाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून रुग्णांच्या शरीरातील दोष, धातू आणि मल यांच्या संतुलनाचा अभ्यास करावा लागतो. आयुर्वेदाच्या सर्जरी शाखेचे शिक्षणही या अभ्यासक्रमात दिले जाते.

होमिओपॅथी: या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीएचएमएस म्हणजेच “बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी” आवश्यक अभ्यासक्रम आहे. यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात औषधे देऊन शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला जातो. बीएचएमएस अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना होमिओपॅथीच्या मूलभूत तत्त्वांचे शिक्षण दिले जाते. ज्यामध्ये औषधनिर्मिती, रोगांचे निदान, आणि उपचार पद्धतींचा समावेश होतो. होमिओपॅथिक औषधांमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो, ज्यामुळे शरीराला कोणतेही अपायकारक दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजी घेतली जाते.

२) दंतचिकित्सा

डेंटल [दंतचिकित्सा] करिअर हा आरोग्यसेवा क्षेत्रातील आणखी एक आकर्षक पर्याय आहे. बीडीएस ही पदवी दंतवैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय, एमडीएसचा अभ्यासक्रमही उपलब्ध आहे ज्यामध्ये विद्यार्थी दंतवैद्यकातील विविध विशेषज्ञतेचे शिक्षण घेतात. अलीकडच्या काळात दंतचिकित्सा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. समाजातील सर्व घटकांमध्ये दातांचे विकार ही एक सामान्य समस्या बनली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उपचार पद्धती बदललेल्या आहेत. ज्यामध्ये दाताची काळजी आणि सुधारणा समाविष्ट आहे. तोंड, दात, हिरड्या आणि तोंडाच्या पोकळीतील इतर कठोर आणि मऊ टिश्यूना त्रास देणाऱ्या सर्व संबंधित पैलूंवर दंतवैद्य उपचार करतात. इम्प्लांटोलॉजी, बालरोग दंतचिकित्सा, मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया आणि ट्रॉमाटोलॉजी, ऑर्थोडॉन्टिक्स, कॉस्मेटिक दंतचिकित्सा आणि इतर अनेक स्पेशलायझेशन उपलब्ध आहेत.

३) योगा आणि नॅचरोपॅथी

सध्या नैसर्गिक उपचारांबद्दल जागरूकता वाढल्यामुळे निसर्गोपचार सारख्या पूरक आणि पारंपारिक औषध पद्धतींची मागणी वाढत आहे. सात आयुष प्रणालींपैकी एक, निसर्गोपचार ही एक जुनी पारंपारिक उपचार पद्धती आहे. निसर्गोपचार ही निरोगी जीवन जगण्याची कला आणि विज्ञान आहे आणि सु-स्थापित तत्त्वज्ञानावर आधारित औषधविरहित उपचार प्रणाली आहे. बीएनवाईएस ही पदवी योगा आणि नॅचरोपॅथीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना योगाचे सखोल ज्ञान, नैसर्गिक उपचार पद्धती आणि जीवनशैली सुधारणा यांचे शिक्षण दिले जाते. गैर-विषारी उपचार, उपचार धोरणे आणि सक्रिय उपचार पद्धतींचा समावेश यात आहे. त्यांना आयुष मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषद (CCRYN), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (NIN) आणि संशोधन केंद्रांसह संशोधन परिषदांमध्ये रोजगाराच्या संधी मिळू शकतात. सरकारी तसेच खाजगी रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रांमध्येही निसर्गोपचारांची नियुक्ती केली जाते.

४) नर्सिंग

रुग्णांची काळजी घेण्यात नर्स [परिचारिका] महत्त्वाची भूमिका बजावतात. नर्सिंगमध्ये विद्यार्थ्यांना रुग्णांची काळजी घेण्याचे आणि वैद्यकीय प्रक्रियांमध्ये सहाय्य करण्याचे शिक्षण दिले जाते. बीएससी नर्सिंग ही नर्सिंगच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक पदवी आहे. नर्सिंगमध्ये विविध विशेषज्ञता पर्यायही आहेत, जसे की, मानसिक आरोग्य नर्सिंग, प्रसूती नर्सिंग, बालरोग नर्सिंग, इत्यादी. GNM-पात्र परिचारिका सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधू शकतात. सरकारी क्षेत्रात ते प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालये इत्यादींमध्ये काम करू शकतात.

५)फिजिओथेरपी

फिजिओथेरपीमध्ये विद्यार्थ्यांना रुग्णांच्या शारीरिक पुनर्वसनाचे शिक्षण दिले जाते. बीपीटी ही पदवी फिजिओथेरपीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक आहे. फिजिओथेरपीमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक उपचार पद्धती, व्यायाम आणि मसाज यांचे सखोल शिक्षण दिले जाते. औषधांचा वापर न करता आजारांवर उपचार करण्यास मदत करते. फिजिओथेरपिस्ट हाडे, स्नायू आणि मज्जातंतूंच्या गुंतागुंतीसह मानवी शरीरशास्त्र, शारीरिक हालचाल, फ्रॅक्चरनंतरचे उपाय, दुखापत आणि इतर विषयांचा सखोल अभ्यास करतात. फिजिओथेरपी करिअर विविध जॉब प्रोफाइल देते जसे की, फिजिओथेरपिस्ट, फिजिओथेरपी संशोधक, होम केअर फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट्स फिजिओ रिहॅबिलिटेटर्स, न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपिस्ट, थेरपी मॅनेजर असे पर्याय आहेत.

६) फार्मसी

‘केमिस्ट शॉप उघडणे’ – लोकांना असे वाटते की, फार्मासिस्ट हे करतो, परंतु प्रत्यक्षात या भूमिकेत औषध व्यवस्थापन, रुग्णाची काळजी आणि नवीन औषधांचा विकास आणि नियमन यांचा समावेश असतो. बी.फार्म ही पदवी फार्मसी क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना औषधांच्या निर्मिती, वितरण आणि व्यवस्थापन याचे शिक्षण दिले जाते. तंत्रज्ञानातील प्रगती, आरोग्यसेवा धोरणातील बदल आणि रुग्णांच्या गरजा बदलून फार्मसीमधील ट्रेंड सतत विकसित होत आहेत. फार्मसी करिअर विविध नोकरीच्या संधी प्रदान करते जसे की फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट, कॉस्मेटिक सायंटिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर आदी.
आरोग्यसेवा क्षेत्र हे अत्यंत विस्तृत आणि महत्त्वाचे क्षेत्र आहे ज्यामध्ये अनेक विविध करिअर पर्याय उपलब्ध आहेत. या क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना कष्ट, संयम आणि निःस्वार्थ सेवेची भावना आवश्यक आहे आणि या क्षेत्रात करिअर करणे हे विद्यार्थ्यांसाठी एक उज्वल भविष्याचा मार्ग ठरू शकतो.

– डॉ. सुचित्रा सुर्वे – ग्रोथ सेंटर
www.growthcentre.org