अक्षय शिंदेचा दफनविधी सोमवारपर्यंत करा – न्यायालय

मुंबई: न्यायालयाने सोमवारपर्यंत अक्षय शिंदे याचा अंत्यविधी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच न्यायालयाच्या सूचना योग्यच असून अंत्यविधी झालाच पाहीजे, अशी भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केली आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या दफनविधीसाठी बदलापूरनंतर अंबरनाथ शहरातूनही विरोध झाला. गुरुवारी अक्षयचे पालक अंबरनाथमधील हिंदू स्मशानभूमी येथे दफन विधीची जागा पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर दफनविधीच्या परवानगीसाठी अंबरनाथ पालिकेत गेले असता त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही. तर अंबरनाथ मनसेच्या वतीने शहरात दफनविधी करण्याला विरोध केला गेला. यानंतर अक्षय शिंदेच्या पालकांचे वकील अमित कटारनवरे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने पोलिसांना लवकरात लवकर जागा शोधून सोमवारपर्यंत अंत्यविधी उरकरण्याचे आदेश दिले. सध्या अक्षय शिंदेचे पार्थिव जेजे रुग्णालयातील शवागरात आहे. सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, बदलापूर आणि आसपासच्या परिसरातून दफनविधीसाठी विरोध होत असल्यामुळे अंत्यविधीला उशीर झाला. आम्ही अक्षय शिंदेच्या पालकांना याची माहिती दिली असून त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून त्यांना पोलीस संरक्षणात अंत्यविधीच्या ठिकाणी नेता येईल.