कोपरखैरणे येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने “ठाणे ग्रंथोत्सव 2024” चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य ग्रंथोत्सव 30 व 31 डिसेंबर 2024 रोजी ज्ञान विकास संस्था, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे पार पडणार आहे.

या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व लोकसभा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे असतील. ग्रंथोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नवी मुंबई महानगरपालिका परिमंडळ-2चे उपायुक्त डॉ.कैलास गायकवाड आणि प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालय, वाशीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे. सकाळी 11 वाजता वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दुपारी 2 ते 4 या कालावधीत भारतीय संविधान “माझा अभिमान” या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात सेवानिवृत्त शासकीय अधिकारी ॲड. बाबुराव हंद्राळे, सेवानिवृत्त न्यायाधीश ॲड. शरद मडके, माध्यम आणि विधी सल्लागार, राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार डॉ.विलास पवार यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 4 ते 5:30 या कालावधीत “शब्दांच्या गावा जावे” हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये दूरदर्शन मुंबईच्या श्रीमती दिपाली केळकर यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी 5:30 ते 6:30 या कालावधीत “कथाकथन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक चांगदेव काळे असणार आहेत तर साहित्यिक आदित्य देसाई, वसुंधरा घाणेकर आणि रामदास खरे यांचा सहभाग असणार आहे.

मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 11:30 या कालावधीत संगीतवर्षा कला प्रतिष्ठान प्रस्तुत “गाथा शिवकालीन इतिहासाची” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11:30 ते 01 या कालावधीत “अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा कशी बनेल?” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे असणार आहेत तर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 3 ते 4:30 या कालावधीत “क-कवितेचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे असणार आहेत तर साहेबराव ठाणगे, रवींद्र पाटील, स्वाती शिवशरण, श्री.नारायण लांडगे पाटील, श्री.प्रशांत सोनकावळे, वृषाली विनायक, संतोष जाधव, शंकर गोपाळे व अक्षता गोसावी यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी 4:30 ते 06 या कालावधीत ज्ञान विकास संस्था, कोपरखैरणे यांच्या कोळीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. सायंकाळी 6 ते 7 या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपालांचा व उत्कृष्ट वाचकांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष चांगदेव काळे, मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेचे सदस्य विनायक गोखले, प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालय, वाशीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रंथप्रेमींनी या ग्रंथोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन ठाणे ग्रंथोत्सव 2024 जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा समन्वय समितीचे अध्यक्ष सहाय्यक ग्रंथालय संचालक, मुंबई विभाग प्रशांत पाटील तसेच सर्व सदस्य, सदस्य सचिव यांनी केले आहे.