बॉयलर स्फोटाने डोंबिवली हादरली

एमआयडीसीतील कंपनीत स्फोट; सात ठार तर ५८ जण जखमी

कल्याण: डोंबिवली एमआयडीसीतील सोनारपाडा परिसरातील सप्तवर्णा कलरनेन्टस या केमिकल कंपनीमध्ये दुपारी सव्वाएकच्या सुमारास झालेल्या स्फोटात सात जण ठार तर सुमारे 58 जण जखमी झाले आहेत.

या स्फोटाच्या भीषण आवाजामुळे दीड ते दोन किलोमीटर परिसर हादरला. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या सप्तवर्णा, अंबर, ओमेगा, डेक्कन आदी 8 ते 10 कंपन्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यातील काही कामगारही जखमी झाले आहेत. कंपनीपासून जवळच असलेल्या कल्याण-शीळ रोडवरील शोरूम्स, सोनारपाडा आणि सागाव येथील अनेक फ्लॅट्स, घरे आणि दुकानांच्या काचाही फुटल्या आहेत. स्फोट नेमका कशाचा झाला?, हे काहीवेळ कुणालाच कळले नाही. जिवाच्या आकांताने लोक घर आणि इमारतींमधून उतरून पळू लागले. कंपनीपासून जवळ असलेल्या मानपाडा रोडवर तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 17 गाड्या, 12 पाण्याचे टँकर, 8 ते 10 ॲम्ब्युलन्स, पोलीस, एनडीआरएफ, टीडीआरएफ, केडीएमसी अधिकारी कर्मचारी वर्ग दाखल झाले असून युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. स्फोटात जखमी झालेल्या 58 जखमींना डोंबिवलीतील एम्स, नेपच्यून, ऑरिदम, शास्त्री नगर, ममता, गजानन, शिवम या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

स्फोटानंतर डोंबिवली पूर्व भागात सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले. तर त्यापेक्षा लांब दूरवरून या स्फोटानंतर लागलेल्या आगीचे-धुराचे लोळ आकाशात उठल्याचे दिसून आले. या स्फोटाचा आवाज येताच केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ज्यामध्ये आतापर्यंत आगीमध्ये जळालेल्या चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

स्फोटात जाखमी झालेल्यांमध्ये ओमेगा, श्रीनिवास, कॉसमॉस, डेक्कन, पीमको, चावरे इंडस्ट्री, महाल प्रिंटिंग प्रेस, शक्ति एन्टरप्रायजेस, मॉडेल इंडस्ट्री, राज सन्स इंडस्ट्री, टेक्नॉ फायबर आदि कंपनीतील कर्मचारी जखमी झाले आहेत.

नेपच्यून हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केलेल्या प्रतीक वाघमारे, रुदयांश दळवी (5) यांना उपचारानंतर सोडण्यात आले. राजन गोठणकर, अक्षता पाटील यांना सिटी स्कॅनसाठी पाठविण्यात आले होते. राजन गोठणकर हे डोंबिवलीतील गांधी नगर येथे राहण्यास असून ते आपल्या शुद्ध लाइट्स या कार्यालयात बसले होते. झालेल्या स्फोटाच्या आवाजाने ते जखमी झाले आहेत.

काल्हेर येथे राहणारे किशोर विसपुते हे कंपनीच्या बाहेर आपल्या चारचाकी गाडीत बसले असता, स्फोटामुळे गाडीच्या काचा फुटल्याने शरीरात काचा घुसून ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ आयसीयुमध्ये ठेवण्यात आले आहे. अंबर कंपनीत कामाला असणाऱ्या बदलापूर येथील मधुरा कुलकर्णी यांच्या डोक्याला जखम झाली आहे. जासई येथे राहणारे बबन देवकर हे तुळजापूर येथून मळी घेऊन एसडीए इंडस्ट्रीज येथे रिकामी करत असतांना स्फोट झाल्याने ते जखमी झाले असून स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता कि त्यांना कानठळया बसल्या असून एका कानाने ऐकू येत नाही. तर त्यांचा दूसरा सहकारी टँकर रिकामी करून बाहेर गेल्याने तो या स्फोटातून वाचला आहे.

हेमांगी चौक या मुलुंड येथे राहणाऱ्या ब्रिक्स केमिकल कंपनीत ऑफिसमध्ये काम करीत असतांना स्फोटाच्या हादऱ्याने ऑफिसचे पीओपी सीलिंग कोसळल्याने त्या जखमी झाल्या आहेत. तर याबाबत नेपच्यून हॉस्पिटलचे डॉ. राम शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता 2012 पासून डोंबिवली एमआयडीसी परिसरातील हा चौथा स्फोट असून स्फोटाच्या तिव्रतेमुळे शीळ रोडवरील घरे, दुकाने यांच्या काचा फुटल्याचे सांगितले.

डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.

16 मे 2016 रोजी डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन 12 जणांचा मृत्यू झाला होता तर दोनशेवर नागरिक जखमी झाले होते. नागरिकांच्या करोडो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.