ठामपा शाळेतही होणार बोर्डाचे परीक्षा केंद्र

ठाणे : ठाण्यात इतर खाजगी शाळांमध्ये दहावी परीक्षा बोर्डाचे केंद्र असताना एवढ्या वर्षात ठाणे महापालिकेच्या शाळेत मात्र केंद्र नसल्याने पालिकेच्या शाळेतही बोर्डाचे परीक्षा केंद्र व्हावे यासाठी शिक्षण विभाग लवकरच यासंदर्भात बोर्डाकडे पत्रव्यवहार करणार आहे.

ठाणे महापालिकेच्या प्राथमिक १११ आणि माध्यमिक २३ अशा मिळून १३४ शाळा आहेत. या शाळांमधून सद्यस्थितीत ३६ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या शाळांमध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू अशा तीनही माध्यमांच्या शाळा भरत असून पालिका शाळांचा पटही गेल्या काही वर्षात वाढत चालला आहे. पालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा तर आता खाजगी शाळांचीही स्पर्धा करू पाहत आहेत. पालिकेच्या माध्यम शाळा असून एवढ्या वर्षात मात्र ठाणे महापालिकेचेही दहावी बोर्डाचे परीक्षा केंद्र असावे यासाठी शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करण्यात आलेले नाही. मात्र आता यासाठी शिक्षण विभागाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक खाजगी शाळा आहेत. अनेक शाळा या फार जुन्या असून या शाळांमध्ये दहावीचे परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे बोर्डात नेमकं काय सुरु आहे याची माहिती वेळेवर या शाळांना मिळत असते. परीक्षा कालावधीत दुसऱ्या शाळांचे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी या शाळांच्या परीक्षा केंद्रावर येत असतात. पालिकेचे परीक्षा केंद्र असेल तर इतर खाजगी शाळेचे विद्यार्थीही पालिकेच्या शाळेत परीक्षा देण्यासाठी येतील. त्यामुळे आता ठाणे महापालिकेच्या शाळेतही दहावीचे परीक्षा केंद्र असावे यासाठी शिक्षण विभाग लवकरच बोर्डाशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली आहे.