भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात ठाण्याच्या जागेवरून होणार राडा

ठाणे: भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातील जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना शिंदे गट दावा करणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ठाण्याच्या जागेवरून पुन्हा एकदा महायुतीमध्ये राडा होण्याची श्यक्यता व्यक्त केली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुका शिवसेना शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस एकत्रित लढणार असून जागा वाटपावरून महायुतीमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात विधानसभेच्या १८ जागा आहेत. त्यापैकी आठ जागा भाजपाच्या ताब्यात आहे तर सेनेकडे पाच जागा शिंदे गटाकडे आहेत. त्यापैकी ठाणे, कल्याण पूर्व आणि भिवंडी पश्चिम या तीन जागांवर शिवसेना शिंदे गट दावा करणार असल्याचे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

ठाणे लोकसभा मतदारसंघ ज्याप्रमाणे मिळवला तशाच प्रकारे ठाणे विधानसभा मतदारसंघ देखिल ताब्यात घेणार असल्याचे त्या पदाधिकाऱ्याने सांगितले. या मतदार संघात शिंदे सेनेची ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना ४८ हजारपेक्षा जास्त मत्ताधिक्य मिळाले आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सेनेच्या उमेदवाराला मदत केली नसल्याचा आरोप केला, तरीसुद्धा या मतदारसंघात लीड मिळाल्याचे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. या पूर्वी देखिल शिवसेना भाजपा युती नसताना राजन विचारे विजयी झाले होते. ही जागा शिंदे गटाकडे आल्यानंतर पुन्हा एकदा सेनेचा या मतदारसंघात विजय होईल असे देखिल त्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

कल्याण पूर्व मतदार संघातील आ. गणपत गायकवाड यांनी युतीच्या उमेदवाराच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत युतीच्या विरोधात काम केले होते. विद्यमान आमदार श्री. गायकवाड यांचा जनाधार संपलेला आहे, त्यामुळे या देखिल मतदारसंघावर आम्ही दावा करणार आहोत, असे एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणाला. भिवंडी पश्चिम मतदारसंघातून भाजपा उमेदवार कपिल पाटील यांना कमी मते मिळाली आहेत. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून हा मतदारसंघ देखिल शिवसेना मागणार आहे, असे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघावरून सेना-भाजपामध्ये संघर्ष झाला होता तसाच संघर्ष विधानसभा निवडणुकीत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान शिवसेना शिंदे गट भाजपाच्या जागांवर दावा करणार असल्याची माहिती मिळाल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याची बैठक बोलाविली असून भाजपच्या जागा स्वतःकडे ठेऊन आणखी जागा पदरात पाडून घेण्यासाठी व्यूहरचना आखली जात असल्याचे भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.