भिवंडी पालिकेचे अग्निशमन दल सक्षम करणार

ताफ्यात दोन अत्याधुनिक वाहने

भिवंडी : महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये आज दोन अत्याधुनिक अग्निशामक वाहनांचा समावेश झाल्याने महानगरपालिकेचे अग्निशामक दल अधिक सक्षमपणे उभे राहिले असल्याचे प्रतिपादन प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी केले आहे.

महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक वाहने दाखल झाली असून त्याच्या लोकार्पण प्रसंगी आयुक्त म्हसाळ बोलत होते. भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये तब्बल १४ हजार लिटर क्षमतेची दोन अत्याधुनिक वाहने दोन कोटी २६ लाख रुपये खर्च करून विकत घेण्यात आल्या आहेत. या सोबतच अग्निशमन दलात सेवा बजावणान्या जवानांसाठी ६५ हजार पाचशे रुपये प्रति किमतीचे ७० पीपीटी किट ४५ लाख ८५ हजार रुपये खर्च करून खरेदी करण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या शुभहस्ते होत असताना याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त मुख्यालय दीपक पुजारी, प्रभारी उपआयुक्त तथा सहाय्यक आयुक्त (जनसंपर्क) प्रणाली घोंगे, अग्निशमन दल प्रमुख राजेश पवार यांसह पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत व त्या लगतच्या गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर आगी लागण्याच्या घटना घडतात. त्यावेळी भिवंडी पालिकेच्या अग्निशमन दलावर ताण पडत असल्याने महानगरपालिकेने या बाबत निर्णय घेत अत्याधुनिक वाहन खरेदी करण्यासोबत अग्निशमन दलातील जवानांसाठी अत्याधुनिक गणवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्यामधून दोन अत्याधुनिक डिजिटल ऑपरेटिंग सिस्टीम असलेली वाहने खरेदी करण्यात आली आहेत. या वाहनांमध्ये १४ हजार लिटर पाणी साठवणूक क्षमता असून प्रति मिनिट तीन हजार लिटर पाणी फवारणी करण्यासाठी पंप बसविण्यात आले आहेत. तर एका वेळी चार नोझल वापरून पाणी फवारणी करता येणे शक्य होणार आहे.

पालिका अग्निशामक दलातील जवानांसाठी उच्च प्रतीचे तीन लेयर गणवेश गमबुट, हॅल्मेट यांचा समावेश असून ४५० ते ५०० डिग्री तापमानात जवानांना काम करता येणे शक्य होणार आहे. या सोबत आपत्तीकालीन परिस्थितीत दुर्घटना स्थळावरील २० ते २५ फूट खाली जाऊन पाहणी करणारा डिटेक्शन कॅमेरा, ३६ फूट उंची वरील झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी करवत, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना मदत करण्यासाठी एक न्यूमॅटिक बॅग अशा इतर ३५ अत्याधुनिक साधनांची खरेदी यामध्ये करण्यात आली असून, या अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदीमुळे भिवंडी महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. त्याचा भिवंडी शहरातील दुर्घटना प्रसंगी जीवित व मालमत्ता यांचे संरक्षण करणे सहज शक्य होणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी दिली आहे.