भिवंडी मनपाने कचरा ठेकेदाराला दिला २४ तासांचा अल्टिमेटम

भिवंडी: भिवंडी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना २४ तासांची नोटीस बजावण्यात आली असून त्यात महानगरपालिकेची किमती वाहने हस्तांतरित करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.

या सोबतच बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेली शासकीय मालमत्ता दिलेल्या मुदतीत परत न केल्यास ठेकेदार संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

भिवंडी महापालिका प्रशासनाने बोरिवली, मुंबई येथील आर अँड बी इन्फ्रा या कंपनीला मे २०२२मध्ये प्रति टन १२२९ रुपये दराने शहरातील दररोज निर्माण होणारा ५५० टन कचरा उचलून तो कचराकुंडीत नेण्याचे कंत्राट दिले होते. याशिवाय महापालिकेनेच पाच कोटी रुपये खर्चून ५० गाड्या आणि २३ कॉम्प्रेसर नाममात्र दराने ठेकेदाराला दिले होते. कचरा उचलण्यासाठी पालिका ठेकेदाराला पैसे देत असतानाही वारंवार नोटिसा देऊनही ठेकेदाराच्या कारभारात सुधारणा झाली नाही. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने १५ मार्च २०२४ रोजी कंपनीला नोटीस देऊन त्यांचा ठेका रद्द करण्यात आला असल्याचे कळविले.

दरम्यान या दिवसांत मनपाच्या पाच विभागीय समित्यांमध्ये पाच छोट्या कंत्राटदारांना आदेश देऊन कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तसेच पूर्वीच्या कंत्राटदाराने महापालिकेची सर्व वाहने दुरुस्त करून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र सुमारे तीन महिने उलटून गेले तरी अद्यापही ठेकेदाराने महापालिकेच्या मालकीची वाहने परत केलेली नाहीत. तसेच महापालिकेची वाहने बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून आहेत. काही वाहनांच्या नंबरप्लेट बदलून त्या कल्याण डोबिवली महापालिकेत चालवल्या जात आहेत. वाहनांचे इंजिन आणि टायर विकले गेले आहेत, असा आरोप नागरिकांकडून करण्यात आला.

याची दाखल घेत भिवंडी शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी सांगितले की, कंत्राटदाराने वाहने परत न केल्याने महापालिकेची सर्व वाहने हस्तांतरित करण्याची नोटीस आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आली आहे नोटीस असूनही वाहन, त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येईल, असे देखील नोटीसमध्ये नमूद करण्यात आले.