भावजयीने दिले दिराला जीवनदान

शहापूर : सध्याच्या युगात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नात्याची माणसे दुरावत चालली आहेत. असे असूनही शहापूर तालुक्यातील एका नवदुर्गेने आपल्या दिराला यकृत देऊन त्यांना जीवनदान दिले आहे. ही घटना लेनाड (गोकुळगाव ) येथील आहे.

ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील लेनाड (गोकुळगाव) येथील आहे.संबंधित रुग्णाला यकृताची समस्या सुरू झाली तेव्हापासून त्यांच्यावर मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णाचे वय 40 असल्याने तसेच प्रपंचाचा गाडाही पाठीशी असल्याने यकृत प्रत्यारोपणाशिवाय कोणताही मार्ग नव्हता. यकृत बदलल्याशिवाय समस्या सुटणार नाही, असे सांगितल्यावर यकृत दान करणार्‍या व्यक्तीचा शोध सुरू झाला. यकृताच्या चाचण्याही यावेळी घेण्यात आल्या. यासाठी अनेकांचा रक्तगट तपासला, त्यात भावजयीचा रक्तगट जुळून आला. या आधुनिक दुर्गाने कोणताही विचार न करता आपल्या दिराला जीवदान देण्याचे ठरविले. या नवदुर्गेच्या आत्मविश्‍वासाच्या बळावर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.

सध्या रुग्णाची तब्बेत चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्याच्या युगात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नात्याची माणसे दुरावत चालली असताना नवदुर्गा भावजयीने दिराला पुनर्जन्म दिल्याने तालुक्यातून कौतूक होत आहे. या घटनेमुळे अवयव दान चळवळीसदेखील प्रेरणा मिळण्यास मदत होईल असे बोलले जात आहे. ही शस्त्रक्रिया करणारे डॉ.गुरुप्रसाद शेट्टी, डॉ.रोहन चौधरी आणि डॉ.अमेय सोनावणे यांसह परिचारिका व तंत्रज्ञ यांचे रुग्णाच्या कुटुंबियांकडून आभार मानले जात आहेत.