रायलादेवी तलावाचे सुशोभिकरण रखडले; कंत्राटदाराला नोटीस

ठाणे : रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम ठाणे महानगरपालिका करणार आहे. त्याचा कार्यादेश दिला असला तरी कंत्राटदाराने काम तर सुरू केलेले नाहीच, शिवाय आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात तलावाजवळ एकही कामगार हजर नव्हता. त्यामुळे हे काम का सुरू झाले नाही, याचा खुलासा करण्याची नोटीस कंत्राटदाराला बजावण्यात आली आहे.

रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे महापालिका, दुसऱ्या टप्प्यात एमएमआरडीए आणि तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारच्या अमृत योजनेत काम होणार आहे. पहिल्या दोन्ही टप्प्यांची कामे सुरू होणे अपेक्षित होते. ती कामे सुरू न झाल्याने आयुक्त श्री. बांगर यांनी पालिकेच्या कंत्राटदारांस नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या कामासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. तसेच, सगळी कामे विहित मुदतीत पूर्ण व्हायला हवी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचवेळी, एमएमआरडीएसोबत पाठपुरावा करण्याचेही निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तीन हात नाका ते वागळे इस्टेट या भागाचा आयुक्त श्री. बांगर यांनी बुधवारी पाहणी दौरा केला. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून सुरू असलेल्या धर्मवीर चौक येथील काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणीही आयुक्तांनी यावेळी केली.

तीन हात नाका येथे जागोजागी कचरा पडलेला होता. तो पाहून स्वच्छता काटेकोरपणे करण्याची सूचना आयुक्तांनी दिली. तसेच, भंगारात पडलेली वाहने उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत करण्याच्या सूचना परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे यांना दिल्या.

डेब्रिज टाकली म्हणून नोटीस

श्रीनगर भागात एका मंगल कार्यालयाजवळ पडलेली डेब्रिज तातडीने हटविण्यास आयुक्तांनी सांगितले. तसेच, वागळे इस्टेट मधील एका रस्त्याचे काम सुरू असताना त्याची डेब्रिज दुसरीकडे टाकल्याबद्दल नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

चेक नाका परिसरातील ‘सुलभ’चे व्यवस्थापन असलेल्या शौचालयांपासून ते वागळे इस्टेटमधील वस्तीतील शौचालयांची स्थिती खूप गंभीर असल्याचे निरिक्षण आयुक्तांनी नोंदवले